हुंचेनहट्टीत तरुणाचा तलवारीने खून
आर्थिक व्यवहारातून कृत्य, मारेकऱ्यांचा तपास सुरू
बेळगाव : तानाजी गल्ली, मजगाव येथील एका तरुणाचा तलवारीने हल्ला करून भीषण खून केला आहे. बुधवारी सायंकाळी जयनगर-हुंचेनहट्टी येथे ही घटना घडली असून रात्री उशिरापर्यंत बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. राहुल तिप्पाण्णा तळवार (वय 23) असे खून झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. तलवारीने वार करून त्याचा खून केला आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण बरमणी, बेळगाव ग्रामीणचे एसीपी गंगाधर बी. एम. यांच्यासह इतर पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
राहुल हा बेळगाव येथील एका औषध दुकानात काम करीत होता. बुधवार दि. 27 मे रोजी सायंकाळी 5.15 वाजण्याच्या सुमारास रामेश्वरनगर परिसरात त्याला बोलावून आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादावादीनंतर त्याच्यावर तलवारीने हल्ला केला आहे. या हल्ल्यात राहुलचा मृत्यू झाला आहे.राहुलच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारीही हुंचेनहट्टी परिसरात तळ ठोकून होते. आरोपी आठ ते दहा जण आहेत, अशी माहिती मिळाली आहे.