For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रात्रीच्या वेळी दरवाजे ठोठावत टिळकवाडी परिसरात युवकाकडून दहशत

12:10 PM Jan 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
रात्रीच्या वेळी दरवाजे ठोठावत टिळकवाडी परिसरात युवकाकडून दहशत
Advertisement

पोलिसांनी घेतले ताब्यात : अथणीचा रहिवासी असल्याचे स्पष्ट, भीतीचे वातावरण

Advertisement

बेळगाव : मध्यरात्री बंद घरांचे दरवाजे ठोठावून नागरी वस्तीत एका युवकाने दहशत माजवली आहे. टिळकवाडी परिसरात ही घटना घडली असून पोलिसांनी अथणी तालुक्यातील एका तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गुरुवार पेठ, टिळकवाडी परिसरात मंगळवारी मध्यरात्रीनंतर एका तरुणाने वेगवेगळ्या इमारतीत घुसून दरवाजा ठोठावण्याचा सपाटाच सुरू केला होता. काही ठिकाणी तर एकाकी महिला असलेल्या घरांना त्याने लक्ष्य बनविल्याचे दिसून आले. पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली असून दहशत माजविणाऱ्या तरुणाच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत.

मध्यरात्री 2.15 वाजण्याच्या सुमारास गुरुवार पेठ येथील एका इमारतीत शिरलेल्या तरुणाने दोन घरांचा दरवाजा ठोठावला. या दोन्ही घरात केवळ महिला होत्या. मध्यरात्री कोण आले? या विचारानेच महिला घाबरून गेल्या. यापैकी एका महिलेने ‘कोण तुम्ही?’ असा आवाज देताच ‘आम्ही पोलीस आहोत, दरवाजा काढा’ असे सांगितले. त्या महिलेने दरडावताच तो तेथून निघून गेला. अनोळखीची दहशत वाढताच मध्यरात्री टिळकवाडीच्या पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधून ही माहिती देण्यात आली. मात्र, सुरुवातीला पोलीस वेळेत पोहोचले नाहीत. पोलीस येण्याआधीच तो तरुण तेथून निघून गेला. याच परिसरातील एका हॉटेलच्या काचाही त्याने फोडल्याचे दिसून आले आहे. शेवटी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेची माहिती पोलीस उपायुक्त नारायण बरमणी यांनाही देण्यात आली.

Advertisement

नागरिकांनी खबरदारी घ्यावी

पोलिसांनी ताब्यात घेतलेला तरुण अथणी तालुक्यातील सिनाळ गावचा असल्याची माहिती मिळाली आहे. त्याने आपले नाव वैभव (वय 25) असे सांगितले आहे. त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या पंधरवड्यापासून टिळकवाडी, चिदंबरनगर, चन्नम्मानगर परिसरात चोरट्यांचा वावर वाढला आहे. मध्यरात्री कुण्या अनोळखीने दरवाजा ठोठावल्यास दार उघडले तर धोका ठरलेलाच आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे. टिळकवाडी पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावरही एकाकी महिलांना दहशतीखाली रहावे लागले याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.