For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मित्रांसमवेत पोहायला गेलेल्या तरुणाचा सावगाव धरणात बुडून मृत्यू

03:49 PM Jun 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
मित्रांसमवेत पोहायला गेलेल्या तरुणाचा सावगाव धरणात बुडून मृत्यू
Advertisement

बेळगाव : पोहण्यासाठी गेलेल्या विजयनगर, सेकंड स्टॉप येथील एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी सावगाव धरणात ही घटना घडली असून रात्री उशिरापर्यंत बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. विवेक सुरेश कदम (वय 19) मूळचा राहणार कलमेश्वर गल्ली, मण्णूर, सध्या राहणार सेकंड स्टॉप, विजयनगर असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. रविवारी दुपारी आपल्या काही मित्रांसमवेत विवेक पोहण्यासाठी सावगाव धरणावर गेला होता. त्यावेळी ही घटना घडली आहे.

Advertisement

पोहता पोहता विवेक धरणात बुडाला. त्यावेळी त्याच्या मित्रांनी व तेथे असलेल्या काही जणांनी त्याला पाण्याबाहेर काढून त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. पोटातून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला. वैद्यकीय उपचारासाठी एका दुचाकीवरून त्याला सावगाव रोडपर्यंत आणण्यात आले. त्याचा मृत्यू झाल्याचे समजताच मृतदेह तेथेच टाकून मित्रांनी आपले घर गाठले. सावगाव येथील धरणावरचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पाण्यात बुडालेल्या विवेकला वाचविण्यासाठी प्रयत्न करतानाचा दोन मिनिटांचा तो व्हिडिओ आहे.

सायंकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर सुरुवातीला कुटुंबीयांनी कॅम्प पोलीस स्थानक गाठले. त्यानंतर बेळगाव ग्रामीण पोलिसांना त्याची माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक नागनगौडा कट्टीमनीगौडर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सावगाव रोडला भेट देऊन पाहणी केली. रात्री त्या तरुणाचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात हलविण्यात आला. एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. घाबरून विवेकला रस्त्यावरच सोडून गेलेल्या त्याच्या काही मित्रांचीही चौकशी करण्यात येत होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.