For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Accident News : पावसात झाडाखाली उभारणं भोवलं, अंगावर वीज पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

12:58 PM May 15, 2025 IST | Snehal Patil
accident news   पावसात झाडाखाली उभारणं भोवलं  अंगावर वीज पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
Advertisement

पाऊस पडताना झाडाच्या आडोशाला उभे असणाऱ्यांवर कोसळली वीज

Advertisement

लांजा : पाऊस पडत असल्याने झाडाच्या आडोशाला उभ्या असणाऱ्या दोघांवर अचानकपणे वीज कोसळली. यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू तर दुसऱ्याच्या पायाला दुखापत झाल्याची घटना लांजा तालुक्यातील गोविळ येथे बुधवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडली.

या बाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गोविळ बौद्धवाडी येथील रहिवासी असलेले राजेश चिमाजी जाधव (45) आणि समीर चंद्रकांत पवार (35) हे दोघे बुधवारी सकाळी मुंबईहून दुचाकीने गावी यायला निघाले होते. सायंकाळी ते गोविळ येथे दाखल झाले.

Advertisement

त्यानंतर दुचाकीने आपल्या घरी गोविळ बौद्धवाडी येथे जात असताना अचानकपणे विजांच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाल्याने ते दोघेही एका झाडाखाली आडोशाला उभे राहिले होते. याचदरम्यान सायंकाळी 5.30 च्या सुमारास वीज थेट या दोघांच्या अंगावर कोसळली. यामध्ये राजेश चिमाजी जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. तर समीर चंद्रकांत पवार यांच्या पायाला दुखापत झाली.

या घटनेची माहिती जखमी समीर पवार यांनी गावात जाऊन लोकांना सांगितली. त्यानंतर तत्काळ या दोघांनाही लांजा ग्रामीण ऊग्णालयात दाखल करण्यात आले. समीर पवार यांच्यावर लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. तर या घटनेत राजेश जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गोविळ गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक गोविळ घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करण्यात आला. या घटनेबाबत अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन भुजबळराव करत आहेत.

Advertisement
Tags :

.