प्रेमविवाह केलेल्या तरूणाची आत्महत्या
कोल्हापूर
चार महिन्यांपूर्वी घरातून पळून जाऊन प्रेमविवाह केलेल्या तरूणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ऋतुराज वसंत पाटील (वय २३, मुळ रा. पणुरे, ता. पन्हाळा, सध्या रा. दुर्गुळवाडी, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. याबाबत करवीर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
ऋतुराज पाटील या तरूणाचे दुर्गुळवाडी गावानजीकच्या एका गावातील तरूणीबरोबर प्रेम संबंध निर्माण झाले. याची माहिती संबंधीत तरूणीच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी याला विरोध केला. तरूणीच्या घरच्यांचा विरोध डावलुन त्यांने आणि संबंधीत तरूणीने घरातून पळून जावून चार महिन्यापूर्वी प्रेमविवाह केला. विवाहनंतर हे नवदाम्पत्य दुर्गुळवाडीत राहत होते. गेल्या आठवड्यात ऋतुराजला काही लोकांनी धमकाविल्याने, त्यातून त्यांने राहत्या घरी ११ मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले. त्यामुळे त्यांच्या आई आणि पत्नीने त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा बुधवारी दुपारी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युची बातमी समजताच त्यांच्या नातेवाईकासह मित्र परिवाराने सीपीआरमध्ये धाव घेतली. या घडल्या प्रकाराची नोंद करवीर पोलिसात झाली असून, ऋतुराजने कोणाच्या धमकीला घाबऊन विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. याची माहिती सांगण्यास पोलिसांनी नकार दिला.