ओटवणे येथील तरुणाचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन
ओटवणे / प्रतिनिधी
ओटवणे देऊळवाडी (तडव) येथील सदानंद ऊर्फ तात्या रामचंद्र गावकर (४९) या तरुणाचे गुरुवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.पहाटे साडेतीनच्या सुमारास सदानंद गावकर यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी तात्काळ सावंतवाडीत दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या अकाली व आकस्मित निधनाने गावकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. शांत आणि मनमिळावू स्वभाव असलेल्या तात्याच्या आकस्मित निधनाचा त्याच्या मित्रपरीवारासह सर्वांनाच धक्का बसला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच ओटवणे गावावर शोककळा पसरली. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या घरी धाव घेत गावकर कुटुंबियांचे सांत्वन केले. येथील सुभाष गावकर आणि प्रभाकर गावकर तसेच मुंबईस्थित प्रकाश गावकर, दिगंबर गावकर, बाळा गावकर यांचे ते भाऊ होत. त्यांच्या पश्चात, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, पाच भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे.