सांगलीवाडीत तरुणाचा ठेचून निर्घृण खून
सांगली :
अनैतिक संबंधाच्या रागातून सेंट्रिंग कामगार दत्ता शरणाप्पा सुतार (वय 30, मूळ रा. इंदिरानगर, सध्या रा. शिवशंभो चौक) याचा तिघा अल्पवयीन युवकांनी एडक्याने वार करून ठेचून निर्घृण खून केला. सांगलीवाडी ते कदमवाडी रस्त्यावर हा प्रकार घडला. हल्यावेळी दत्ताचा मित्र अतुल दत्तात्रय ठोंबरे (रा. शिवशंभो चौक) हा आपल्याला देखील मारतील या भितीने पळून गेला. सांगली शहर पोलिसांनी अवघ्या दोन-तीन तासात खुनाचा छडा लावला. तिघांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मृत दत्ता सुतार हा सेंट्रिंग कामगार म्हणून सळ्या बांधण्याचे काम करत होता. त्याचा विवाह झाला असून त्याला दोन मुली आहेत. कुटुंबासह तो इंदिरानगर परिसरात राहत होता. त्याला दारूचे व्यसनही होते. कोरोना काळात एका महिलेशी त्याचे अनैतिक संबंध जुळून आले. ती महिला अल्पवयीन मुलासह राहत होती. दत्ता याच्या अनैतिक संबंधामुळे पत्नीने त्याला जाब विचारला. पत्नीशी सतत वाद होऊ लागला. त्यामुळे तो गेली दीड ते दोन वर्षे महिलेच्या घरातच तिच्या मुलासह शिवशंभो चौक परिसरात राहत होता.
दत्ता सुतार हा फारसा कामधंदा करत नव्हता. महिलेचा मुलगा लहान असल्यामुळे सुरवातीला त्याला समज नव्हती. परंतु नंतर आईबरोबर दत्ताचे अनैतिक संबंध पाहून मुलाला राग येत होता. गुरूवारी दुपारी तो दोन अल्पवयीन साथीदारांसह कदमवाडी परिसरात घोडी चरायला घेऊन गेला होता. त्याने दत्ताला पैसे पाहिजेत म्हणून कदमवाडी रस्त्यावर बोलवून घेतले. दत्ता त्याचा मित्र अतुल ठोंबरे याला घेऊन कदमवाडीकडे दुपारी दीडच्या सुमारास गेला. वाटेत तिघे अल्पवयीन युवक थांबलेले दिसले. गाडी थांबवल्यानंतर मागे बसलेला दत्ता नशेतच होता. तो खाली उतरताच तिघांनी त्याच्यावर हला चढवला. हला पाहून मित्र अतुल पळून गेला. छातीवर दगड मारताच दत्ता खाली पडला. तेव्हा एडक्याने दत्ताच्या चेहऱ्यावर व डोक्यावर वार करताच तो जागीच मृत झाला.
फारसी वर्दळ नसलेल्या रस्त्यावर खून केल्यानंतर एक दुचाकीस्वार रस्त्यावरून येताना दिसताच तिघे युवक कदमवाडीकडे पळाले. दुचाकीस्वाराने शहर पोलिसांना माहिती देताच पोलीस निरीक्षक संजय मोरे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मृत दत्ता रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. दुचाकीही तेथेच होती. मृताजवळ ओळखीचा पुरावा नव्हता. शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवण्यास सुरूवात केली. तेव्हा मृताची ओळख पटली. संशयितांची नावे निष्पन्न झाली. त्यांनाही तत्काळ ताब्यात घेतले.