For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युवा जादूगार वैभव कुमार यांना इंडिया एक्सलन्स अवॉर्ड प्रदान

04:10 PM Apr 03, 2026 IST | अनुजा कुडतरकर
युवा जादूगार वैभव कुमार यांना इंडिया एक्सलन्स अवॉर्ड प्रदान
Advertisement

पुणे येथील आर्टबीट्स फाउंडेशनचा राष्ट्रीय पुरस्कार

Advertisement

ओटवणे प्रतिनिधी
ओटवणे येथील प्रसिद्ध युवा जादूगार वैभव कुमार (वैभव रामदास पारकर) यांना पुणे येथील आर्टबीट्स फाउंडेशनच्या आर्टबीट्स इंडिया एक्सलन्स अवॉर्ड’ या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्माननीत करण्यात आले आहे. या संस्थेच्यावतीने कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी विविध कलाक्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान केला जातो. कला व मनोरंजन विभागात कोकणातील उत्कृष्ट जादूगार म्हणून त्याची निवड करण्यात आली.आर्ट बिटस् ही संस्था गेली २५ वर्षे सातत्याने विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून त्यांच्या कलेचा गौरव करते. यावर्षी जादूगार वैभव कुमार याच्या जादू कलेची दखल घेत त्याला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जादूगार वैभव कुमार याने जादूच्या कलेत अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पारंपारिक जादू आणि आधुनिक स्टेज प्रेझेंटेशन यांचा उत्कृष्ट संगम साधत त्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यांच्या सादरीकरणामध्ये हिप्नॉटिझम, सस्पेन्स, काॅमेडी, नाट्यमयता आणि प्रेक्षकांशी संवाद साधण्याची खास शैली त्यांच्या कार्यक्रमात दिसून येते, त्यामुळे त्यांचे कार्यक्रम नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात. उल्लेखनीय म्हणजे त्याने जादू कलेचा उपयोग केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक प्रबोधनासाठीही केला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी त्याने विविध शाळा व ग्रामीण भागात जादूतुन चमत्कार आणि त्याच्या मागील विज्ञान यांचे शेकडो प्रयोग सादर करून समाजात जनजागृती करण्याचे कार्य करीत आहे. लहानपणापासून जादूची आवड असणाऱ्या जादूगार वैभवकुमार याने पारंपारिक नोकरी किंवा व्यवसाय न निवडता जादूचे प्रयोग या आगळ्यावेगळ्या व्यवसायाकडे वळला. जादूचे प्रयोग सादर करून रसिकांचे मनोरंजन करण्यासह तणाव मुक्त जीवन कसे जगावे हे जादूच्या प्रयोगातून दाखवून दिले. जादूला भाषा तसेच वय नसते त्याचप्रमाणे पाच वर्षाच्या मुलांपासून ८५ वर्षापर्यंतचे ज्येष्ठ नागरिकही बेहद्द खूष होतात. पुणे, मुंबई, सुरत, हैदराबाद, सिकंदराबाद, बेंगलोर, दिल्ली अशा अनेक ठिकाणी या महोत्सवांना जाऊन तिथे आपली कला सादर करून महाराष्ट्रासह जिल्ह्याचे पर्यायाने आपल्या गावाचे नाव रोशन केले.त्याच्या या यशामुळे कोकणातील नवोदित कलाकारांसाठी नवी दिशा निर्माण झाली असून ग्रामीण भागातूनही राष्ट्रीय स्तरावर यश मिळवता येते हे त्याने सिद्ध करून दाखवले आहे. जादूगार वैभवकुमार याला आजपर्यंत महाराष्ट्र लोक गौरव पुरस्कार, राष्ट्रीय युवा जादूगार पुरस्कार, जादू भूषण पुरस्कार, जादू विशारद पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा बाल वैज्ञानिक विज्ञान पुरस्कार व दिल्लीत मिळालेल्या वर्ल्ड बुक ऑफ टॅलेंट रेकाॅड इंटरनॅशनल पुरस्कार अशा अनेक संस्थांकडून सन्मानित करण्यात आले. भविष्यात तो आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपल्या कलेचा ठसा उमटवतील यात शंका नाही. त्यादृष्टीने आता केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची तो तयारी करत आहेत. तसेच कोकणात जादूची एक छोटी अकादमी सुरू करून या लुप्त होत चाललेल्या कलेला पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचा त्याचा मानस आहे. वैभवकुमार याच्या या यशाने सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून त्याचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.या पुरस्काराबाबत जादूगार वैभवकुमार म्हणतो, “हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणा दायी आहे. कारण ओटवणे सारख्या ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावर जादूची कला सादर करणे आव्हान होते मात्र माझ्या ग्रामदेवतेची कृपा व ग्रामस्थांच्या आशीर्वादाने, प्रेक्षकांचे प्रेम, कुटुंबाचा पाठिंबा आणि सततची जिद्द, मेहनत व संघर्ष यामुळे हे शक्य झाले.”

Advertisement
Advertisement
Tags :

.