कुरियर पार्सल भरकटल्याचे सांगत शेतकरी तरुणाला लाखाचा गंडा
यलीमुन्नोळीच्या तरुणाला हातोहात फसवले
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
तुमचे कुरियर महाराष्ट्रातून कोलकात्याला आले आहे, ते परत पाठवण्यासाठी तुमची वैयक्तिक माहिती पाठवण्याबरोबरच 5 रुपये फोन पे करा, असे सांगत सायबर गुन्हेगारांनी यलीमुन्नोळी येथील एका शेतकरी तरुणाच्या बँक खात्यातून 1 लाख 4 हजार रुपये हडप केले आहेत.
यासंबंधी जिल्हा सायबर क्राईम विभागात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. श्रीधर नामक 29 वर्षीय युवकाने फिर्याद दिली आहे. श्रीधरच्या बहिणीने बीएस्सी नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडे एक वर्षापूर्वी तिने नोंदणी केली होती. कर्नाटकात काम करण्यासाठी महाराष्ट्राकडून एनओसी लागते.
एनओसीसाठी त्यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून अर्ज केला होता. त्यावेळी त्यांना एक ट्रॅकर आयडी मिळाली होती. 30 सप्टेंबर रोजी ट्रॅकर आयडीच्या माध्यमातून पाहणी करताना पेंडींग अशी माहिती मिळाली. 30 सप्टेंबर रोजी त्यांना एक फोन कॉल आला, ‘तुमचे कुरियर चुकून महाराष्ट्रातून कोलकात्याला आले आहे’, असे सांगण्यात आले.
कुरियर परत मिळविण्यासाठी आम्ही एक लिंक पाठवतो. त्या लिंकमध्ये माहिती भरून 5 रुपये फोन पे करा, असे सांगण्यात आले. अज्ञातांच्या सांगण्यावरून या शेतकरी युवकाने आपले नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आदी माहिती भरून फोन पे च्या माध्यमातून 5 रुपयेही पाठवले. 3 ऑक्टोबर रोजी या तरुणाच्या बँक खात्यातून 1 लाख 4 हजार रुपयांहून अधिक रक्कम गुन्हेगारांनी हडप केली.