जम्मूमध्ये डॉक्टर तरुणीची हत्या
आरोपी देखील डॉक्टर ः हत्येनंतर आत्महत्येचा प्रयत्न
वृत्तसंस्था / जम्मू
जम्मूमध्ये महिला डॉक्टरला तिच्या डॉक्टर प्रियकराने चाकूने सपासप वार करून ठार केले आहे. डॉक्टर महिलेच्या हत्येनंतर युवकाने स्वतःवरही चाकूने वार केले आहेत. आरोपीने फेसबुकवर पोस्ट अपलोड करत वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते. त्याची ही पोस्ट पाहून त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांना पाचारण करत त्याला रुग्णालयात हलविले आहे. आरोपी डॉक्टराची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. ही घटना मंगळवारी घडली असली तरीही पोलिसांनी शुक्रवारी यासंबंधी माहिती दिली आहे.
जम्मूत राहणाऱया सुमेधा शर्माने बीडीएस केले होते. तिच्यासोबत शिकणाऱया जौहर गनईसोबत ती प्रेमात होती. बीडीएस केल्यावर सुमेधा पुढील शिक्षणासाठी दिल्लीत गेली होती. होळीच्या सुटीनिमित्त ती जम्मूमध्ये आली होती. यानंतर ती जौहरला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. तेव्हा दोघांमध्ये भांडण झाले आणि यादरम्यान जौहरने सुमेधावर चाकूने अनेक वार केले. या हल्ल्यामुळे सुमेधाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यामुळे घाबरून गेलेल्या जौहरने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
पोलिसांनुसार आरोपी आणि महिला दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते. आरोपीच्या विरोधात कलम 302 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोघांमध्ये कुठल्या कारणामुळे भांडण झाले होते याचा तपास आता पोलीस करत आहेत. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर जौहरला अटक करण्यात येणार आहे.