इंदापुरात तरुण त्वचारोगतज्ज्ञ डॉ. अवधूत खबाले यांची आत्महत्या; अकाली निधनाने शहर सुन्न; वैद्यकीय क्षेत्रात हळहळ
इंदापूर : येथील अंबिकानगर परिसरात वास्तव्यास असलेले २९ वर्षीय उदयोन्मुख त्वचारोगतज्ज्ञ डॉ. अवधूत विठ्ठल खबाले यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज, गुरुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. दोन महिन्यांपूर्वीच वडिलांचे निधन झाल्याने ते प्रचंड मानसिक तणावात होते, यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली. मेडिकल व्यावसायिक प्रताप छगन खबाले यांना त्यांचे बंधू डॉ. शिवाजी खबाले यांनी फोनवरून या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच नातेवाईकांनी इंदापूर पोलिसांच्या मदतीने डॉ. अवधूत यांना तातडीने इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
डॉ. अवधूत खबाले हे अल्पवधीतच इंदापूर शहरासह परिसरात निष्णात आणि लोकप्रिय त्वचारोगतज्ज्ञ म्हणून नावारूपाला येत होते. अभ्यासू आणि नम्र स्वभावाच्या या तरुण डॉक्टराने अचानक एक्झिट घेतल्याने वैद्यकीय वर्तुळासह संपूर्ण इंदापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे. अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. पितृशोकाच्या दुःखातून ते सावरू शकले नव्हते आणि याच मानसिक तणावातून त्यांनी जीवनयात्रा संपवल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
या घटनेची नोंद इंदापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून, पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक भारत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.