भर दिवसा युवा उद्योजकाचे अपहरण
ज्योफिलनगर-फेंडा येथील संदीप चौधरी : भंगारअड्ड्याच्या वैरत्वावरून अपहरणाचा संशय ,
पोलिसांनी उशीर केल्याने अपहरणकर्ते पसार होण्यात यशस्वी
फोंडा : फोंड्यातील एका बिगरगोमंतकीय युवा उद्योजकाचे दिवसाढवळ्या ज्योफिलनगर-फोंडा येथील कार्यालयातून बाहेर पडताना अज्ञातांनी कारगाडीत कोंबून अपहरण केल्याची घटना काल मंगळवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. संदीप छत्रलाल चौधरी (32, मूळ राजस्थान, सध्या राहणारा ज्योफिलनगर फोंडा) असे त्याचे नाव आहे. फोंडा पोलिस अपहरणकर्त्याच्या मागावर कुळेपर्यंत पोचले असता त्यापूर्वीच अपहरणकर्त्याचे दुसऱ्या वाहनातून पलायन झाल्याने फोंडा पोलिस मेहनत करुनही हतबल बनले आहेत. फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप चौधरी याचा भंगाराच्या मालाची उकल करण्याचा व्यवसाय आहे. कुंडई, बेतोडा, उसगांव, मडकई या औद्योगिक वसाहतीतून भंगाराची उकल करण्याचा व्यवसाय तो करीत होता.
कार्यालय बंद करताना अपहरण
दुपारच्या सुमारास तो आपल्या ज्योफिलनगर येथील कार्यालयात अन्य एका सहकाऱ्याबरोबर होता. दुपारी कार्यालय बंद करतेवेळी सहकाऱ्याकडे कुलुप बंद करण्यासाठी दिले आणि तो पुढे सरकला. सहकारी कुलुप बंद करून रस्त्यावर पोहोचेपर्यंत एका इसमाला स्विफ्ट कारमध्ये कोंबत असल्याचे त्याने पाहिले. कारगाडीतून संदीप याचे चप्पल बाहेर पडले, चप्पलवरून तो संदीपच असल्याची पुष्टी झाली. त्याने लागलीच कारगाडीचा पाठलाग केला. सेंट अॅनिस चर्चजवळून अपहरणकर्ते भरधाव वेगाने पसार झाले. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त झाला असून फोंडा पोलिस त्याच्या मागावर आहेत. सदर प्रकार भंगार व्यवसायातील वैरत्वावरून झाल्याचा संशय फोंडा पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस विविध टिमकडून अपहरकर्त्यापर्यंत पोहोचेपर्यंत कारगाडीचा नंबरही बनावट असल्याची माहिती प्राप्त झाली असून दुसरी नंबर प्लेट लावून दुसऱ्या वाहनातून त्याला गोवा हद्दपार करण्यात यश आले. त्यामुळे फोंडा पोलिस हतबल झाले असून परराज्यातील पोलिसांकडे संपर्क साधण्यात आला आहे.
पोलिसांनी उशीर केल्यामुळे...
याप्रकरणी घटनेची तक्रार फोंडा पोलिसस्थानकात तातडीने दिली होती. फोंडा पोलिसांनी वेळ दवडल्यामुळेच अपहरणकर्त्याना गोव्याची हद्द पार करण्यासाठी पुरेसा अवधी मिळाला. त्यानंतर घाई करीत फेंडा पोलिसांनी म्हार्दोळ पोलिस निरीक्षक योगेश सावंत, कुळे पोलिस निरीक्षक राघोबा कामत यांची टिम करून शोधकार्य सुरू केले, मात्र त्यात काहीच हाती लागू शकले नाही. तोपर्यंत वेळ निघून गेली होती. यासंबंधी अपहरणकर्त्यानी संदीपचा फोन बंद केल्यामुळे तपासाची गती मंदावली आहे. खंडणीसाठी अपहरण केले की व्यवसायातील वैरत्वामुळे याची शहनिशा फोंडा पोलिस करीत आहेत. संदीप चौधरी यांचे कुटुंबीय मागील तीस वर्षांपासून गोव्यात वास्तव्यास आहेत. संदीपचे आई वडील, पत्नी व एक दीड वर्षाची मुलगी असा परिवार आहे.
सात महिन्यांपूर्वी लांबविली होती रोकड
सात महिन्यांपूर्वी कुंडई ओद्योगिक वसाहतीतून भंगार अड्ड्याचा सौदा केल्यानंतर रोकड घेऊन दुचाकीने येत असताना चौधरीच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला दुचाकीवरून झाडीत फेकून त्याच्याकडील रोकड लांबविली होती. त्याच्या स्कूटरची चावी हिसकावून डिकीतील रोख दीड लाख ऊपयांसह त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर काही दिवसांनी चोरट्यांना म्हार्दोळ पोलिसांनी अटक केली होती. याच घटनेचा वचपा काढून उद्योजकाला अद्दल घडविण्यासाठी त्याचे अपहरण केले असावे का? असाही कयास फोंडा पोलिसांनी लावून त्या घटनेतील संशयितांना विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.