आज ना उद्या दंड भरावाच लागणार!
वाहन विक्री करताना येणार अडचणी : कोट्यावधी रुपयांचा दंड वाहनचालकांनी भरणे बाकी
बेळगाव : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना टीएमसीद्वारे दंडाच्या नोटिसा पाठविल्या जात आहेत. मात्र, दंडाची रक्कम भरण्याकडे अनेकांनी दुर्लक्ष केले असले तरी सदर वाहन विक्री किंवा रिपासिंग करायचे असल्यास वाहनावरील दंड भरणे गरजेचे आहे. दंड न भरल्यास संबंधित वाहनाची विक्री किंवा रिपासिंग करता येणार नाही. शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागावी यासाठी गेल्या काही वर्षांपासून महानगरपालिका आणि पोलीस खात्याकडून प्रयत्न सुरू आहेत. पार्किंगसाठी आवश्यक जागा उपलब्ध नसल्याने वाहनचालक जागा मिळेल त्या ठिकाणी मनमानी पद्धतीने वाहने उभी करत आहेत. महानगरपालिकेकडून पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येत नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. त्यातच पोलीस आयुक्तांनी वाहनचालकांची अडवणूक करून स्पॉट फाईन घालू नये, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचे नंबर टिपून त्यांना दंडाच्या नोटिसा पाठवण्यात याव्यात, अशी सूचना केली असल्याने रहदारी पोलिसांकडून टीएमसीच्या माध्यमातून संबंधितांना नोटिसा धाडल्या जात आहेत.
दंड वसूलीसाठी शहरात विविध ठिकाणी काऊंटर
कोट्यावधी रुपयांचा दंड वाहनचालकांकडून भरणे बाकी आहे. त्यामुळे सदर दंड वसूल व्हावा यासाठी शहरात विविध ठिकाणी काऊंटर सुरू करण्यात येत आहेत. त्या ठिकाणी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली असून वाहनचालकांकडून वाहनावरील दंडापैकी 50 टक्के रक्कम भरून घेतली जात आहे. तर 50 टक्के रकमेची सूट दिली जात आहे. त्यामुळे बऱ्यापैकी दंड वसूल होण्यास मदत झाली आहे. तरीदेखील बहुतांश जणांनी दंड भरण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
दंडाची रक्कम भरण्यासाठी पुढे यावे
सदर दंड कोणत्याही प्रकारे चुकवता येणार नाही. कारण दंड बाकी असलेली वाहने दुसऱ्याला विकताना सेकंड ओनरच्या नावावर होणार नाहीत. इतकेच नव्हे तर पंधरा वर्षांनंतर रिपासिंग करण्यासाठी गेले असता पासिंगही करण्यात येणार नाही. त्यावेळी दंडाची रक्कम भरल्यानंतरच वरील प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी याकडे दुर्लक्ष न करता दंडाची रक्कम भरण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले जात आहे.