For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हे धर्म-युद्ध टाळूनी पापात पडशील तू

06:46 AM Oct 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
हे धर्म युद्ध टाळूनी पापात पडशील तू
Advertisement

अध्याय दुसरा

Advertisement

भगवंत म्हणाले, अर्जुना, आत्मा प्रत्येकाचे मूळ स्वरूप असून तो कधीच नष्ट होत नाही. मनुष्य जन्म हा आत्मस्वरूप जाणून घेण्यासाठीच आहे. ज्याना ह्या ब्रह्मचैतन्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची तळमळ लागून राहते ना, त्यांना विषय आपोआपच नकोसे होतात. ज्याने ब्रह्मरस चाखला आहे त्याला गुळवणी कसे गोड लागेल? आत्मरूपी चैतन्य विश्वामध्ये सर्वत्र भरलेले असून ते अमर आहे. हे जग त्याच्या मर्जीने उत्पन्न होते आणि नाहीसे होते, म्हणून नातेवाईकांचे देह नाहीसे होणार ह्याबद्दल तू शोक करू नकोस.

स्वधर्माचा म्हणजे कर्तव्याचा विचार केला, तर या युद्धापासून परावृत्त होणे योग्य नाही कारण क्षत्रियाला कर्तव्यप्राप्त धर्मयुद्ध करण्याशिवाय दुसरे कोणतेही कल्याणाचे साधन नाही. स्वधर्माचे आचरण केले असता कोणताही दोष न लागता सर्व इच्छा सहजच पूर्ण होतात. आताचे हे युद्ध म्हणजे तुझे पूर्वजन्मीचं भाग्य होय. असे हे धर्मयुद्ध सहजी प्राप्त होत नसते. पुष्कळ पुण्य करावे, तेव्हा क्षत्रियाच्या जीवनात असे धर्मयुद्ध करावयास मिळते.

Advertisement

अर्जुनाला स्वधर्म सांगण्याच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांनाच भगवंत सांगत आहेत की, प्राप्त परिस्थितीत आपापले कर्तव्य करत राहणे हेच हितकर असते. बऱ्याचवेळा आपले कर्तव्य काय आहे हे समजत असूनसुद्धा आपण ते स्वार्थापोटी, शारीरिक कष्ट होऊ नयेत म्हणून किंवा आळसामुळे टाळत असतो. असे करणे निश्चितच आपल्या हिताचे नसते. पुढील श्लोकात भगवंत अर्जुनाला म्हणतात, हे धर्मयुद्ध जर टाळणार असशील तर स्वधर्म आणि कीर्ती यांचा त्याग करून तू पापाचा धनी होशील.

हे धर्म-युद्ध टाळूनि पापात पडशील तू । स्वधर्मासह कीर्तीस दूर सारूनिया स्वये ।। 33 ।।

श्लोकाच्या विवरणात माऊली म्हणतात, भगवंतानी अर्जुनाला असे सांगितले की, अनायासे प्राप्त झालेला संग्राम टाकून भलत्याच गोष्टींचा शोक करत बसलास तर स्वत:च स्वत:चा घात करून घेशील. ह्यामुळे तुझी आणि तुझ्या पूर्वजांची पुण्यकीर्ति धुळीला मिळेल. सगळे जग तुझी निंदा करेल, तुला नावे ठेवेल आणि महापातके तुझा शोध घेत येतील. रणभूमीवर टाकून दिलेल्या मृत शरीराला ज्याप्रमाणे चोहोबाजुनी गिधाडे टोच्या मारतात, त्याप्रमाणे स्वधर्म न पाळणाऱ्या पुरुषाला महादोष त्रास देतात. माउलींनी दिलेल्या उदाहरणावरून लक्षात येते की, गिधाडांच्या तिक्ष्ण चोची जशा खोलवर जखमा करून वेदना देतात त्याप्रमाणे स्वधर्मपालन टाळणाऱ्या व्यक्तीस महादोषामुळे दु:ख आणि वेदनेचे धनी व्हावे लागते. पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, सर्वजण अखंड तुझी अपकीर्ती करत राहतील. सन्मान्य माणसाला अपकीर्ती मरणापेक्षाही अधिक दु:खकारक असते.

अखंड लोक गातील दुष्कीर्ति जगती तुझी । मानवंतास दुष्कीर्ति मरणाहूनि आगळी ।। 34 ।।

माउली श्लोकाच्या विवरणात म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, स्वधर्मचा त्याग करशील, तर निश्चितच पापाला पात्र होशील आणि कल्पांतापर्यंत युगानुयुगे तुला लागलेला अपकीर्तिचा काळिमा नाहिसा होणार नाही. अपकीर्ति जोपर्यंत अंगाला स्पर्श करीत नाही, तोपर्यंतच शहाण्याने जगावे असे असताना युद्धातून निघून जाऊन तू अपकीर्ती का ओढवून घेतोस? तू कौरवांनी दिलेला त्रास आणि त्याबद्दल आलेला राग विसरून, दयायुक्त अंत:करणाने रणातून माघारी फिरत आहेस हे ह्यांना कळणार नाही. त्यामुळे हे कौरव तुला चोहोबाजुंनी घेरतील व तुझ्यावर बाणांचा वर्षाव करतील.

क्रमश:

Advertisement
Tags :

.