48 हजारांचे शूज पाहून चक्रावून जाल!
कचऱयाच्या ढिगातून आणल्यासारखी स्थिती
लक्झरी ब्रँड आणि फॅशन कंपनी बलेनसियागाने एक अशाप्रकारचे शूज तयार पेले आहेत, ज्यामुळे लोकांनी सोशल मीडियावर कंपनीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने ‘पॅरिस स्नीकर’ कलेक्शन जारी केले आहे. प्रत्यक्षात ‘पॅरिस स्नीकर’ कलेक्शनमध्ये सामील करण्यात आलेले शूज अत्यंत वापरलेले आणि फाटलेले दिसून येतात.
तर कंपनीने या अत्यंत वापरलेल्या, फाटलेल्या अवस्थेत दिसणाऱया शूज लिमिटेड एडिशन कलेक्शनमध्ये सादर केल्या आहेत. या शूजची किंमत 48,279 रुपये आहे. शूजना एकदा पाहिल्यावर ते एखाद्या कचऱयाच्या ढिगातून काढून आणल्यासारखे दिसत असल्याचे काही लोकांनी म्हटले आहे.
बलेनसियागा कंपनीने शूज निर्मितीमागचा उद्देश सांगितला आहे. कंपनीनुसार या शूजचे क्लासिक डिझाइन मध्यकालीन ऍथलेटिक्सला प्रदर्शित करते, हे शूज काळय़ा, पांढऱया, लाल रंगात उपलब्ध आहेत. त्यांचे सोल आणि पुढील हिस्स्यात पांढऱया रंगाचे रबर आहे. या शूजकडे पाहिल्यास ते पूर्वी कुणीतरी वापरले असल्याचे जाणवते.
हे शूज ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध झाल्यावर सोशल मीडियावरील इंटरनेट युजर्स चक्रावून गेले आहेत. अनेक युजर्सनी बलेनसियागाने नवे शूज सादर करून लोकांनाच ट्रोल केल्याची उपरोधिक टिप्पणी केली आहे. हे शूज बेघर लोकांच्या पादत्राणांपेक्षाही खराब असल्याचे काही जणांनी म्हटले आहे.
सध्या कंपनीचे हे शूज युरोपीय बाजारांमध्ये उपलब्ध आहेत. तर मध्यपूर्व आणि अमेरिकेच्या स्टोअरमध्ये हे शूज 16 मेपासून उपलब्ध होणार आहेत. तर जपानमध्ये 23 मे रोजी हे शूज मिळू लागतील. ऑनलाइन इंटरनॅशनल स्टोअरच्या माध्यमातून हे शूज खरेदी करता येऊ शकतात.