जेथे जातो तेथे तू माझा सांगाती । चालविसी हाती धरुनिया
अध्याय तिसरा
बाप्पा म्हणाले, प्रज्वलित झालेल्या ज्ञानाग्नीची दाहकता एव्हढी प्रचंड असते की, ती त्या तपस्व्याची अंतर व बाह्य कर्मे क्षणात जाळून नष्ट करते. अंतर कर्मे म्हणजे संचित कर्मे होय. ही पूर्वी केलेली असतात पण अद्याप त्याचे फळ मिळाले नसते. तर बाह्य कर्मे म्हणजे येथून पुढे हातून घडणारी कर्मे असे म्हणता येईल. कर्मेच नष्ट झाल्यावर त्यापासून तयार होणाऱ्या पाप पुण्याचा हिशोब आपोआपच संपतो आणि चालू आयुष्यात, निरपेक्षतेनं कर्म करत असल्याने मोक्षपदी आरूढ झालेला साधक आयुष्य संपले की, ईश्वरात विलीन होतो. ज्याला स्वत:च्या कर्तृत्वाचा अभिमान नसतो, त्यालाच आत्मज्ञान ही सगळ्यात पवित्र वस्तू प्राप्त होते. वर्तमानात व भविष्यातही संपूर्ण निरपेक्ष झाल्याने त्याला त्याच्या परिस्थितीत कोणताही बदल हवा असे वाटत नाही. या मन:स्थितीत राहणे म्हणजेच मोक्ष होय. ही स्थिती एकदा प्राप्त झाली की कधीही बदलत नाही. असे हे ब्रह्मज्ञान योग्य वेळी साधकाला प्राप्त होते. योग्यवेळी म्हणजे साधनेमध्ये हळूहळू प्रगती होत गेली की, साधकाची स्व द्यायची तयारी होते. मी कर्ता आहे हा समज संपूर्ण नाहीसा होतो व ईश्वर कर्ता करविता आहे हा विचार दृढ झाला की, साधकाला ब्रह्मज्ञान प्राप्त होते. ब्रह्मज्ञान प्राप्त होण्यासाठी योग्यवेळ येण्यासाठी कोणती पात्रता साधकाच्या अंगी यावी लागते ते बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.
भक्तिमानिन्द्रियजयी तत्परो ज्ञानमाप्नुयात् ।
लब्ध्वा तत्परमं मोक्षं स्वल्पकालेन यात्यसौ ।। 47 ।।
अर्थ- भक्तिमान, इंद्रिये जिंकलेल्या व ज्ञानतत्पर मनुष्याला आत्मज्ञान प्राप्त होते. ते मिळविल्यानंतर अल्पकाळातच तो मोक्षाला जातो.
विवरण- ईश्वराची भक्ती करणाऱ्या जितेंद्रिय साधकाला आत्मज्ञान मिळवण्याची तळमळ लागलेली असते. ईश्वरभक्तीत रममाण झालेल्या मनुष्यास इतर कोणत्याही गोष्टीचे अप्रूप वाटत नाही. त्याला सर्वत्र ईश्वराचे अस्तित्व जाणवत असते. त्यामुळेच भक्त प्रल्हादाने या खांबात तुला ईश्वर दिसतो का? या हिरण्यकश्यपूच्या प्रश्नावर प्रल्हादाने दृढतापूर्वक निर्धाराने होय म्हणून सांगितले. त्यासरशी हिरण्यकश्यपूने तिरिमिरीत जाऊन त्या खांबाला लाथ मारल्याबरोबर त्यातून ईश्वराला नृसिह अवतारात प्रकट व्हावे लागले आणि प्रल्हादाला अतोनात त्रास देणाऱ्या हिरण्यकश्यपूचा वध करून ‘विनाशायच दुष्कृताम’ या त्याच्या वचनाचा प्रत्यय आणून द्यावा लागला. हे केवळ प्रल्हादाच्या ईश्वर भक्तीमुळे साध्य झालं. अखंड नामस्मरणाने ईश्वर सर्वत्र भरून राहिला आहे ही जाणीव सदैव जागृत राहते हे प्रल्हादाने दाखवून दिले. ही जाणीव जागृत असलेला भक्त ईश्वरापासून वेगळा राहूच शकत नाही. त्याचं स्वत:चं अस्तित्व त्यानं ईश्वरात केव्हाच विलीन करून टाकलं असतं. त्याला सतत ईश्वर आपल्याबरोबर आहे ह्याची अनुभूती येत असते. तुकोबांनी हा अनुभव घेऊनच पुढील अभंग लिहिला आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती । चालविसी हाती धरुनिया । चालो वाटे आम्ही तुझाची आधार । चालविसी भार सवे माझा । बोलो जाता बरळ करिसी ते नीट । नेली लाज, धीट केले देवा । तुका म्हणे आता खेळतो कौतुके । जाले तुझे सुख अंतर्बाही। आपला सर्व भार ईश्वराने घेतलेला आहे आणि आपल्या हाताला धरून, आपल्याला आधार देत तो पुढे नेत आहे. वेळोवेळी आपले बरळणे नीट करून आपल्याला सावरून घेत आहे मग भीती कसली ही कल्पनाच किती दिलासादायक आहे आणि त्याचा वारंवार अनुभव घेणारे संत किती धन्य होत असतील हेही लक्षात येते. अर्थात आपल्यासारख्या सामान्य माणसालाही ईश्वर आपल्याला सावरून घेत आहे ह्याची अनुभूती येत असते पण ते आपण सहजी मान्य करत नाही कारण आपण स्वत:ला कर्तृत्ववान समजत असतो.
क्रमश: