For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रीकृष्णा योगमायेवर तुमची सत्ता चालते

06:21 AM Jan 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
श्रीकृष्णा योगमायेवर तुमची सत्ता चालते
Advertisement

अध्याय तिसावा

Advertisement

नाथमहाराज म्हणतात, आपल्या बाणाने श्रीकृष्णाच्या चरणांचा वेध घेतला ही बाब जराव्याधाच्या मनाला लागून राहिली. तो वारंवार श्रीकृष्णाची करुणा भाकू लागला. म्हणू लागला, ज्या विष्णूच्या नामाने माणसाचे कोटीजन्मांचे घोर अज्ञानाचे निर्दालन होते आणि ते घेणाऱ्याचे संपूर्णपणे कल्याण होते त्याला मी बाण मारला. ज्याचा अगाध महिमा साधु सज्जन सदा वर्णन करतात, अशा जगाचे जीवन असलेल्या कृष्णाला मी निर्वाणीचा बाण मारला. केव्हढा घोर अपराध मी केला. श्रीकृष्ण जगाचा निर्माता आहे त्या पित्याचा घात माझ्या हातून झाला. श्रीकृष्ण माता होऊन जगाचे पालन करतो, त्या मातेचाच घात मी केला.

श्रीकृष्ण ब्राह्मणांना ब्रह्मबोध करतात त्यांचा वध म्हणजे माझ्या हातून ब्रह्मवध झाल्यासारखेच आहे. ह्यापेक्षा घोर अपराध जगात दुसरा नसेल. श्रीकृष्णांना बाण मारून एकाचवेळी राजघात, आत्मघात, मातृपितृ-ब्रह्मघात असे किती अपराध माझ्या हातून घडले त्याला गणतीच नाही. आता हृषीकेशी माझ्यावर कृपा करा. असंख्य अपराध करून मी रचलेल्या पापांच्या राशी निक्रिय होतील असा उपाय लवकर करा.

Advertisement

मला असं वाटतं की, नुसत्या तुमच्या कृपेने माझ्या घोर अपराधाचे परिमार्जन होणार नसल्याने तुम्ही माझा वध करा. म्हणजेच माझी शुद्धी होईल. मी पापबुद्धीने लडबडलेला आहे, त्यातून हरणाच्या लोभाने त्यांची शिकार करणारा पशुपारधी आहे. तुम्ही स्वत:च्या हाताने माझा वध केलात तरच माझी शुद्धी होईल. ज्या देहाने हे पापकर्म केले तो देह तुम्ही निपटून टाका म्हणजे पुन्हा त्याच्या हातून असे घोर पापकर्म होणार नाही. ह्या कायेने तुम्हाला बाण मारण्याचे अगाध पाप केले आहे तिचा तुम्ही शीघ्र वध करावा. हेच प्रायश्चित्त ह्या कायेने केलेल्या महापापासाठी योग्य आहे. असे म्हणून त्याने श्रीकृष्णाचे चरण घट्ट पकडले. येथून पुढे जराव्याध सर्वसामान्यांचे देह धारण करणे आणि भगवंताचे देह धारण करणे ह्यांची तुलना करून त्यातील जमीन अस्मानाचे अंतर दाखवत आहे. तो म्हणतो, स्थूल सूक्ष्म आणि कारण ही देहधारण करण्याची मूळ कारणे आहेत. परंतु तुम्ही ईश्वरी अवतार असल्याने तुम्हाला चतुर्भुज देह धारण करण्यासाठी ह्यापैकी कोणत्याही कारणाची गरज नाही. योगमायेच्या सत्तेने तुम्ही लीलया नाना देह धारण करता. तुमचा लीलाविग्रह हे एक आश्चर्य आहे. मत्स्य, कूर्म, वराह असे देह कोणतीही शंका न बाळगता धारण करता. जन्माचे भय तुम्हाला नाही. एखादा जरी देह धारण करायचे म्हंटले तर ब्रह्मादिक रंक होतात परंतु तुम्ही निजात्मतेने नि:शंकपणे अनेक देह सहजी धारण करता. नियतीच्या गतीप्रमाणे देहाला नाना भोग भोगावे लागतात. तुम्ही मात्र नियतीच्या प्रभावाने बाधित होत नसल्याने नाना भोगसंपत्ती भोगत असता. जोपर्यंत आयुष्य असते तोपर्यंत देह धारण करावा लागतो हे वेदांनीच ठरवून दिले आहे. हे झाले सर्वसामान्यांच्या बाबतीत पण तुमची गोष्टच न्यारी आहे. तुमच्या लीलेचा चमत्कार असा आहे की, तुम्ही आयुष्याशिवाय देह धारण करत असता.

काळाची सत्ता सर्वांच्यावर चालत असते. अगदी ब्रह्मादिकांनाही ती मान्य करावी लागते. त्यामुळे त्यांनाही मरण टाळता येत नाही. तुम्हाला मात्र आयुष्याची मर्यादा नसल्याने तुमचे मरण तुमच्या इच्छेनुसार येत असते. दुर्धर अशा काळावर तुमची सत्ता चालत असल्याने तुम्हाला इच्छामरण येऊ शकते. योगमायाही तुमच्या नजरेखाली काम करत असल्याने लीला करून तुम्ही समाजाला देहस्थिती दाखवता. तुमची ही लीला सर्वार्थाने सर्वांनाच अतर्क्य अशी आहे कारण त्यामागील कार्यकारण भाव कुणालाच कळत नाही. तसं बघितलं तर ब्रह्मा हा जगाचा आदिकर्ता आहे पण त्यालाही तुमच्या सत्तेची व्याप्ती कळत नाही.

क्रमश:

Advertisement
Tags :

.