For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रद्धा जरूर असावी परंतु ,अंधश्रद्धेच्या गर्तेत सापडू नका

12:47 PM Apr 09, 2026 IST | अनुजा कुडतरकर
श्रद्धा जरूर असावी परंतु  अंधश्रद्धेच्या गर्तेत सापडू नका
Advertisement

मेधा  सामंत- पुरव यांचे प्रतिपादन ; सावंतवाडीत जयानंद मठकर व्याख्यानमालेचे आयोजन

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

आजच्या काळात महिला सर्व क्षेत्रात काम करताना दिसत आहेत. त्या सक्षम बनल्या आहेत अशा परिस्थितीतही काही महिला अंधश्रद्धेपोटी भोंदू बाबांच्या आहारी जाताना दिसत आहे. नाशिकमध्ये घडलेले प्रकरण याचे उदाहरण आहे. अंधश्रद्धे विरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली अनेक वर्षे काम करत आहे अशा घटना घडत असतानाही समिती काय करते असा सवाल सर्वजण करत असतात. परंतु, प्रत्येकाने स्वतः आत्मपरीक्षण केले पाहिजे असे प्रतिपादन पुणे येथील मेधा  सामंत- पुरव यांनी येथे केले.

Advertisement

येथील श्रीराम वाचन मंदिरात श्रीराम वाचन मंदिर आणि सावंतवाडी सहकारी पतपेढी यांच्या वतीने स्वातंत्र्य सैनिक जयानंद मठकर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे दुसरे पुष्प गुंफताना सामंत-पुरव बोलत होत्या. त्यांच्या व्याख्यानाचा विषय महिला सक्षमीकरणाची 50 वर्षे हा होता. अध्यक्षस्थानी वंदना करंबळेकर होत्या.त्या म्हणाल्या महिला सक्षमीकरणाची चळवळ अमेरिका ,युरोप ,रशिया येथे सुरू झाली. त्यानंतर भारतात ही चळवळ सुरू झाली. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथे चळवळ सुरू केली. मुलींना शिक्षण देण्यास त्यांनी सुरुवात केली. याच काळात राजाराम मोहन रॉय यांनी सती प्रथेविरोधात चळवळ सुरू केली. स्वातंत्र्यानंतरच्या काळात महिला सक्षमीकरणासाठी अनेक प्रयत्न झाले. चिपको आंदोलनात महिलांनी सहभाग दर्शवला होता. याशिवाय महाराष्ट्रात सरकार आणि साठेबाजीविरोधात मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर ,प्रमिला दंडवते यांनी लाटणी मोर्चाचे आंदोलन केले होते. गिरणी कामगारांच्या संपातही महिलांचा समावेश होता. इंदिरा गांधी यांनी 1975 ला देशात आणीबाणी लादली होती. यामध्ये त्यांनी 20 कलमी कार्यक्रम राबवण्याचे निश्चित केले होते. आणीबाणीला विरोध असला तरी त्यातील दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी राबवण्यात येणारा उपक्रम चांगला होता. असे त्या म्हणाल्या. युनोने ८ मार्च १९७५ ला जागतिक महिला दिन जाहीर केला. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल होते.महिला सक्षम झाल्या आहेत . परंतु, आजच्या काळातही महिलांवर अन्याय, अत्याचार होत आहेत .नाशिक येथील प्रकरण आणि एप्सटिन फाईल हे त्याचे उदाहरण आहे. महिलांनी आजच्या काळातही सजग राहून अन्याय ,अत्याचारा विरोधात आवाज उठवला पाहिजे ,महिलांनी अंधश्रद्धेला बळी पडू नये, श्रद्धा जरूर असावी परंतु अंधश्रद्धेच्या गर्तेत सापडू नये असे सांगून त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात भिडे वाडा येथे शाळा सुरू केली होती हा भिडे वाडा कोलमडून पडत असताना त्यासमोरच महिला अथर्वशीर्ष पठण करतानाची बातमी प्रसिद्ध झाली होती. बाबा आढाव यांनी हा भिडे वाडा पुन्हा बांधणीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला त्यामुळे भिडेवाडा पुन्हा व्यवस्थित झाला.

 डॉ. मेधा पुरव सामंत यांनी “महिला सक्षमीकरणासाठी ‘अन्नपूर्णा’च का?” या मुद्द्यावर विशेष भाष्य केले. त्या म्हणाल्या की, “महिला सक्षम झाल्या तर कुटुंब सक्षम होते आणि कुटुंब सक्षम झाले तर समाज सक्षम होतो.” १९७५ साली त्यांच्या आई प्रेमा पुरव यांनी अन्नपूर्णा महिला मंडळाची स्थापना केली. वडील कॉ. दादा पुरव यांच्या मार्गदर्शनातून या कार्याचा विस्तार ‘अन्नपूर्णा परिवार’ या व्यापक स्वरूपात करण्यात आला.१९९३ साली भाजीपाल्याची विक्री करणाऱ्या महिलांना सूक्ष्म कर्ज देण्यापासून या उपक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीला केवळ नऊ महिलांना कर्ज देण्यात आले होते. आज मात्र सव्वालाख महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात या संस्थेला यश आले आहे. “तारण नसलेल्या महिलांना बँक कर्ज देत नाहीत आणि खासगी सावकार मोठ्या व्याजदराने कर्ज देतात. हीच समाजाची गरज ओळखून आम्ही हा उपक्रम सुरू केला,” असे त्यांनी स्पष्ट केले. बँक ऑफ इंडियातील नोकरी सोडून कुटुंबाच्या विश्वासावर हा प्रवास सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, त्यांच्या आई-वडिलांचा डाव्या चळवळीतील सहभाग, तसेच गांधी आणि मार्क्स यांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव आहे. त्यांच्या आईने गिरणीकामगार महिलांबरोबर काम केले, तर वडिलांनी बँक कर्मचारी संघटनेचे नेतृत्व केले. बालमोहन शाळेतील शिक्षण व विद्यार्थी चळवळीतील सहभाग यामुळे समाजकार्याची बीजे रोवली गेली. “बँकिंग हे केवळ ‘क्लास’साठी नसून ‘मास’साठी असावे,” या विचारातूनच त्यांनी सहकाराच्या माध्यमातून कार्य सुरू केले.अन्नपूर्णा परिवाराचा विस्तार स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, पुण्यातील ६५० आणि मुंबईतील सुमारे १ हजार झोपडपट्ट्यांमध्ये संस्थेचे काम सुरू आहे. महिला क्रेडिट सोसायटीचे सुमारे एक लाख पंचवीस हजार सभासद असून त्यातील ९५ टक्के महिला आहेत. ‘आरोग्यनिधी’ या विमा योजनेद्वारे २ लाख ५० हजार सभासदांचे संरक्षण केले जात आहे. ‘आधरपूर्णा’ निवृत्ती योजना, पाळणाघरे, ‘विद्यापूर्णा’ शिष्यवृत्ती योजना अशा विविध उपक्रमांद्वारे समाजाच्या विविध स्तरांपर्यंत पोहोचण्याचे कार्य सुरू आहे.तसेच दादा पुरव संशोधन केंद्राच्या माध्यमातून सूक्ष्म अर्थपुरवठ्यावर संशोधन केले जाते, तर २००८ पासून ‘पूर्णा ई-सोल्युशन्स’च्या माध्यमातून सॉफ्टवेअर सेवा पुरविल्या जात आहेत. या सर्व उपक्रमांमुळे महिला सक्षमीकरणाला एक सर्वसमावेशक दिशा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.“अन्नपूर्णा परिवारातून समाजाने काय घ्यावे?” याबाबत  त्या म्हणाल्या की, समाजातील गरजू महिला आणि विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या उपक्रमांमध्ये नागरिकांनी सहभाग घ्यावा. “शहरांतील झोपडपट्ट्यांकडे तुच्छतेने पाहू नका. त्या ठिकाणांहून येणारे लोकच शहराचे जीवनमान उंचावतात. त्यांच्या जीवनमानाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. यावेळी प्राध्यापक प्रवीण बांदेकर एडवोकेट संदीप निंबाळकर रमेश बोंद्रे आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.