रांगेत उभे राहण्यासाठी मिळतात पैसे
एका रेस्टॉरंटबाहेर दिसून येतो अजब प्रकार
न्यूयॉर्कच्या कॅरोल गार्डनमधील प्रसिद्ध पिझ्झोरियामध्ये केवळ रोख रक्कम स्वीकारली जाते. तेथे स्वत:सोबत मद्य आणण्याची अनुमती असून तेथे कुठलेही टेबल पूर्वीपासून राखीव नसते. हे रेस्टॉरंट जे-झेड आणि बेयॉन्से यासारख्या दिग्गजांच्या पसंतीचे ठिकाण आहे. येथे टेबल मिळविण्यासाठी लोक टास्कर हायर करत असल्याचे समोर आले आहे.
सप्टेंबर महिन्यात टेलर स्विफ्ट आणि ट्रॅव्हिस केल्से यांनी येथे डिनर केले होते. यानंतर या रेस्टॉरंटमध्ये जागा मिळविण्यासाठी रांगेत उभे राहण्याकरता टास्कर हायर करण्याची मागणी 30 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. रांगेत उभे राहण्याचे काम तान्या बी. देखील करते. या रेस्टॉरंटमध्ये रांगेत उभे राहण्याची मागणी सर्वाधिक असते असे तान्याने सांगितले आहे. तान्या रांगेत उभे राहण्यासाठी दर तासाला 20 डॉलर्सचे शुल्क आकारते. अनेकदा ती तीन तासापर्यंत रांगेत उभी असते.
दोन तासांसाठी 65 डॉलर्स
या रेस्टॉरंटमध्ये बहुतांश काम तीन तासांचे असते असे अन्य टास्कर कोलिन्स बीने सांगितले आहे. तर लेसा राब ही न्यूयॉर्कमध्ये एक प्रकाशिका असून मागील महिन्यात या रेस्टॉरंटमध्ये टेबल बुक करण्यासाठी तिने एका एजेन्सीकडून टास्कर हायर केला. टास्करने दोन तासांपर्यंत रांगेत उभे राहून चार जणांचे टेबल मिळवून दिले होते. याकरता लेसाने 65 डॉलर्स खर्च केले आहेत.
स्वत: रांगेत उभे राहणे अवघड काम
राबने प्रथम स्वत: रांगेत उभे राहण्याचा प्रयत्न केला, परंतु ती अपयशी ठरली. मागील वेळी जेव्हा मी आणि माझ्या प्रियकराने प्रयत्न केला, तेव्हा आम्ही एक तासापर्यंत रांगेत उभे राहिलो, तरीही टेबल मिळू शकले नाही. तेव्हा अनेक लोक पैसे देऊन टास्करना रांगेत उभे करवत असल्याचे आमच्या निदर्शनास आले. याचमुळे पुढील वेळी आम्ही याचे अनुकरण करण्याचा निर्णय घेतला असे राब सांगते. रांगेत उभे राहण्यासाठी टास्करची सेवा पुरविणाऱ्या एजेन्सीनुसार अलिकडच्या महिन्यांमध्ये रेस्टॉरंटमध्ये टेबल किंवा अन्य गोष्टींसाठी रांगेत उभे राहण्याच्या विनंतीत मोठी वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये ही मागणी सप्टेंबरच्या तुलनेत 56 टक्क्यांनी वाढली होती.
टास्कर्ससाठी सोपे पैसे कमाविणे
रांगेत उभे राहून मी दर महिन्याला जवळपास 2 हजार डॉलर्सपर्यंत कमावितो. सुटीच्या काळात हा बिझनेस आणखी चांगला ठरतो असे रांगेत उभे राहण्याचे काम करणाऱ्या कोलिन्स बीने सांगितले आहे. तर रांगेत उभे राहताना नेहमी आरामदायी बूट परिधना करते, हवामानानुसार लेयरिंग करते आणि स्वत:सोबत छत्री, स्नॅक्स, पाणी आणि एक पोर्टेबल स्टूल बाळगत असल्याचे तान्याचे सांगणे आहे.