For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टाळी एका हाताने वाजत नाही !

06:32 AM Jul 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
टाळी एका हाताने वाजत नाही
Advertisement

‘ऑपरेशन सिंदूर’च्या दरम्यान भारताने पाकिस्तानला जाणाऱ्या सिंधू नदीचे पाणी अडविले. त्यातून पाकिस्तानात भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज या गोष्टीला एक वर्ष होऊन गेले आणि पाकिस्तानला त्याची जबरदस्त झळ बसू लागली आहे. मात्र पाकिस्तानवर भारतातील काही राजकीय नेते अतोनात प्रेम करीत आहेत. त्यांचा आत्मा सध्या अस्वस्थ झालेला आहे.

Advertisement

भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी एकत्र यावे आणि दोन्ही देशादरम्यान सलोखा निर्माण करावा, अशी मागणी हे असंतुष्ट आत्मे करू लागले आहेत. यामध्ये अपेक्षेप्रमाणे जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री मेहबूब सईद, पाकिस्तानचे काही नेते, आरजेडी पक्षाचे मनोज झा आणि तृणमूल काँग्रेसचे हुमायून कबीर असे अनेकजण मिळून एकूण 117 जणांनी त्या मागणीपत्रावर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. त्यातील 61 भारतीय आहेत आणि 56 पाकिस्तानी आहेत. भारतावर वारंवार हल्ले करून भारतात पूर्णत: अस्वस्थता निर्माण करणाऱ्या पाकिस्तानने भारतातील हजारो निरपराध लोकांची हत्या केली, त्यावेळी ही माणसे भारत सरकारच्या विरोधात निवेदन करीत होती. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी देखील ही मंडळी नेमकी कोणत्या प्रतिक्रिया देत होती, याचा विचार करा. या देशात राहायचे आणि आपले हृदय मात्र पाकिस्तानात असावे, असा काही तथाकथित बुद्धिवंत मंडळींचा देखील यात समावेश आहे. पाकिस्तानचे काही मंत्री परवाच बोलून गेले की सिंधू नदी आमची आहे आणि ती कोणी अडविण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचे हात तोडून टाकू. दुसऱ्या एका मंत्र्याने तर भारताला आणखी वेगळ्या प्रकारची धमकी दिली आणि हे सर्व पाकिस्तान सरकारमधील मंडळी बोलते त्यावेळी त्याचा साध्या शब्दांमध्ये देखील निषेध करावा, असे या पत्रावर स्वाक्षऱ्या करणाऱ्यांपैकी कोणाला वाटले नाही. ही मंडळी पाकिस्तानच्या समर्थनार्थ एकत्र येतात आणि सह्यांचे निवेदन दोन्ही देशांच्या पंतप्रधानांना देतात. भारताने आजपर्यंत सामंजस्याची भूमिका घेतली. काँग्रेसच्या काळामध्ये जी काही पाकिस्तानच्या संदर्भात भूमिका घेतली, त्या मवाळ भूमिकेमुळेच पाकिस्तानने वारंवार आपल्या दहशतवाद प्रशिक्षित मंडळींना भारतात पाठविले. भारतात दंगली घडविल्या, बॉम्बस्फोट घडविले, गोळीबार केले. जम्मू-काश्मीरमध्ये तर दहशतवाद निर्माण करून हजारो नागरिकांची कत्तल केली. हा देश या सर्व घटना विसरू शकत नाही. म्हणूनच ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान भारताने जो काही कठोर निर्णय घेतला, त्याच्या विरोधात पाकिस्तानने भारताच्या विरोधात गरळ ओकली. भारताविरोधात युद्धही पुकारले आणि नंतर पाकिस्तानने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे जाऊन युद्ध संपुष्टात आणण्यासाठी शरणागती देखील पत्करली. संपूर्ण भारत बेचिराख करु, अशी धमकी देणाऱ्या पाकिस्तानला आपली यंत्रणा ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी चालविता आली नाही हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. भारताविरोधात संपूर्ण जगात कटकारस्थाने करण्याचा अथक प्रयत्न पाकिस्तानने केला आणि तो व्यर्थ ठरला. त्यामुळेच पाकिस्तान म्हणजे साप आहे, या सापाला कितीही दूध पाजले तरी तो फुत्कारणारच. ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानमध्ये जो काही हाहाकार माजला त्यातून अद्याप पाकिस्तान बाहेर पडलेला नाही. पाकिस्तानी नागरिकांचे जे हाल होतात ते पाकिस्तान सरकारच्या कर्मामुळे. भारताविरोधात सातत्याने प्रचार करून आपली खुर्ची सांभाळण्यात गर्क असलेल्या पाकिस्तानातील कट्टरवाद्यांनी आजही भारताला संपविण्याच्या भाषा करायच्या आणि दुसऱ्या बाजूने आम्ही बोलणी करण्यास तयार आहोत असे सांगायचे, या ढोंगी प्रवृत्तीपासून भारताला बोध घ्यावा लागेल आणि तो घेतलेला आहे. आता दोन्ही देशांदरम्यान समन्वय हवा ही गोष्ट खरी आहे, परंतु टाळी एका हाताने वाजत नाही. सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानला मिळत नाही हीच खरी पाकिस्तानची मुख्य अडचण आहे. संपूर्ण जगात एक दहशतवादी राष्ट्र म्हणून पाकिस्तानची सर्वत्र ओळख आहे. अशावेळी या पाकिस्तानच्या मदतीसाठी 117 जणांपैकी भारतातील 61 मंडळी दोन्ही देशात दरम्यानच्या पंतप्रधानांना पत्र लिहून शांतता प्रस्थापित करण्याची मागणी करतात. वास्तविक शांततेपेक्षा त्यांना सिंधूचे पाणी पाकिस्तानातील पाण्याविना तडफडणाऱ्या जनतेला मिळावे हा कदाचित अंतस्थ हेतू असू शकतो. भारताने जो काही निर्णय घेतलेला आहे तो विचारपूर्वक घेतलेला आहे. पाकिस्तान जोपर्यंत भारताला शरण येणार नाही तोपर्यंत भारत या असल्या कोणत्याही गोष्टीसमोर वाकणार नाही. मानवता हा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे आणि भारताने वारंवार पाकिस्तानला मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत केलेली आहे. परंतु त्याचा पूर्णत: विसर पाकिस्तानला पडलेला आहे. बांगलादेशच्या प्रत्येक अडचणीच्यावेळी भारताने त्या देशाला सर्वदृष्ट्या मदत केली होती परंतु तोच बांगलादेश आज भारताविरोधात कटकारस्थाने करताना दिसत आहे. भारतातील काही नेते एका बाजूने बांगलादेशचे समर्थन करतात आणि दुसऱ्या बाजूने पाकिस्तानचे समर्थन करतात. त्यातल्या त्यात काँग्रेसचे अनेक नेते हे पाकिस्तानच्या धोरणाचे बऱ्याचवेळा समर्थन करताना आपल्याला दृष्टीस पडतात. यातून खरे देश प्रेम या मंडळींचे स्पष्ट होत असते.

Advertisement
Advertisement
Tags :

.