ठरवलं तर बदलता येतं...
खरंतर स्वत:ला किंवा इतरांना त्रासदायक ठरतील अशी वैशिष्ट्या प्रत्येकाच्या स्वभावात असतात. ज्यांना ती ओळखून वेगळी काढता येतात ते स्वत:मध्ये बदल घडवून आणू शकतात. बदलाची दिशा ठरवू शकतात, यासाठी आपला शोध आपल्याला लागायला हवा हे मात्र खरं! स्वभावातला बदल म्हणजे पर्यायाने दृष्टिकोनातील बदल. दृष्टिकोनातील बदल म्हणजे विचारांमधलाच बदल. बऱ्याच गोष्टी विचारांवर अवलंबून असतात.
एका कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी जाण्याचा योग आला. लेक्चर नंतर विद्यार्थी येऊन भेटत होते. एक विद्यार्थिनी आली आणि म्हणाली ‘मॅम, स्वाभावाला काही औषध असतं का हो? आपण आजुबाजूच्या अनेक गोष्टी बदलू शकतो फर्निचर, फ्रीज, शाळा, कॉलेज, नोकरी अगदी घर सुद्धा..पण मनुष्याचा स्वभाव कशात मोडतो? बदलू शकणाऱ्या यादीत की न बदलू शकणाऱ्या? खरंतर यावर बराच वेळ चर्चा झाली. तिला समजेल अशा पद्धतीने समजावून सांगितले आणि तिची समस्याही जाणून घेतली. खरं सांगायचं तर आपण जर स्वत: ठरवलं तर स्वभावाला औषध निश्चितच असतं! स्वत:ला आणि इतरांनाही त्रासदायक ठरणारे स्वभावातील बोचरे कंगोरे जर बोथट किंवा नाहीसे करता आले तर सुखाचा आणि आनंदाचा मार्ग सुकर होऊ शकतो! परंतु, स्वभाव बदलण्याची तयारी त्या व्यक्तीची हवी हे मात्र निश्चित.
मुळातच माणसाचा जो काही स्वभाव आणि स्वभाव म्हणून स्थिरावणारा त्याचा दृष्टिकोन बनतो तो कसा बनतो हे बघायला हवे. जन्मापासून कुटुंबातल्या व्यक्तींकडून विशेषत: आई-वडिलांकडून होणारे संस्कार, शिक्षक, शेजारी, पुस्तके, मित्र यांच्या माध्यमातून मिळणारे अनुभव, मूल्य, विचार हे व्यक्तीचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा तिचे जीवन विषयक तत्वज्ञान तयार करत असतात. शारीरिक आणि मानसिक विकासाच्या कालखंडात काही काळ अस्थिरतेचाही असतो. इथे काही विचारांची पडझड होताना दिसते. वर्तनातली विसंगती सुद्धा अनुभवी लागते. हळूहळू वर्तनातली काही वैशिष्ट्या स्थिर होत जातात आणि विचारांची एक पक्की चौकट तयार होते. ज्याला आपण स्वभाव म्हणतो. सर्व अनुभव हे त्या चौकटीतच तपासले जातात. त्यातील अनेक विचार, समजुती कालबाह्य ठरल्या तरी सुद्धा एकेकाला सोडवत नाहीत. पक्क्या चौकटीच्या बाहेर पडण्याची गरज असते पण चौकट सोडवत नाही. तेव्हा संघर्ष आणि समस्या उत्पन्न होतात. अनुवंश आणि परिस्थिती या दोन्हीतून स्वभाव आणि दृष्टिकोनाची जडणघडण होत असली हे जरी खरं असलं तरी प्रसंगानुरूप त्यात बदल करण्याची गरज भासली तर तेवढीच लवचिकता असणं पण आवश्यक आहे. ज्या लोकांना ते जमत नाही त्यांना आपण हट्टी, ताठर म्हणतो. त्यांचा निर्णय अगदी एखाद्या काळ्या दगडावरच्या रेघेसारखा असतो.
खरंतर स्वत:ला किंवा इतरांना त्रासदायक ठरतील अशी वैशिष्ट्या प्रत्येकाच्या स्वभावात असतात. ज्यांना ती ओळखून वेगळी काढता येतात ते स्वत:मध्ये बदल घडवून आणू शकतात. बदलाची दिशा ठरवू शकतात, यासाठी आपला शोध आपल्याला लागायला हवा हे मात्र खरं! स्वभावातला बदल म्हणजे पर्यायाने दृष्टिकोनातील बदल. दृष्टिकोनातील बदल म्हणजे विचारांमधलाच बदल. बऱ्याच गोष्टी विचारांवर अवलंबून असतात. विचार-भावना-वर्तन (कृती) ही एक साखळी आहे. त्यांचं परस्परांशी नातं असतं. जसे विचार असतील तशा भावना उत्पन्न होतात आणि त्याप्रमाणे वर्तन वा कृती घडते.
उदा. आपण प्रवासाला निघालो आहोत आणि आपल्या समोरच्या सीटवरती एक आई बसली आहे आणि तिच्याजवळ तिचे छान गोंडस, निरागस बाळ आहे. किती छान बाळ आहे असा विचार मनात येतो आणि आपण त्याच्या निरागसतेवरती खुश होऊन त्याला उचलून घेण्याची, त्याच्याशी बोलायला लागण्याची कृती घडते. चांगला विचार चांगली कृती घडवतो.
वाईट विचारातून नकारात्मक आणि वाईट भावना निर्माण होतात आणि तशी कृती घडते. चुकीच्या विचारांमधून अनेक आत्मघातकी भावना निर्माण होत असतात. चिंता, मत्सर. अपराधीपणाची भावना, वैरभाव अशा नकारात्मक आणि स्वहिताला बाधा आणणाऱ्या भावनांचे स्वरूप समजले तर त्याच्यावरती काम करून त्याचं समूळ उच्चाटन करता येतं. मनुष्याच्या सर्वांगीण विकासाच्या आड येणाऱ्या या भावना त्याला दुर्बळ बनवतात. त्याच्यातील सुजनशीलता बाजूला करतात. व्यक्ती निक्रिय होते. तसेच मनोवृत्तीची शिकार देखील होऊ शकते.
अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी विवेकनिष्ठ उपचार पद्धतीद्वारे अशा नकारात्मक भावनांचं तर्काधिष्ठीत विचारसरणीद्वारा समूळ उच्चाटन करून आयुष्यातला हरवलेला आनंद, सुख मिळवता येतं, हे दाखवून दिले आहे. इंग्रजीत रॅशनल इमोटिव्ह थेरेपी या नावाने परिचित असलेलं हे मानसोपचार तंत्र केवळ वर्तन विकृतीने त्रस्त व्यक्तींसाठीच उपयुक्त ठरतं असं नाही तर ते सामान्य माणसाने सुद्धा दैनंदिन जीवनातील ताणतणाव, भीती, चिंता गैरसमज, खंत, राग, द्वेष यापासून बाजुला करून निरामय आयुष्य जगायला शिकवतं.
या तंत्राचा उपयोग करून आपण चुकीच्या, नकारात्मक अथवा अवास्तव दृष्टिकोनात बदल करू शकतो. बदललेला सकारात्मक दृष्टिकोन अंगवळणी पडला की ती व्यक्ती निश्चितपणे क्रियाशील, उत्साही, सर्जनशील बनून आत्मविकासाच्या दिशेने वाटचाल करू लागते. प्रेम, आदर्श, स्वीकार, आनंद या भावनांमुळे व्यक्तीच्या परस्पर संबंधात देखील सुधारणा होते. माणूस सभोवताली घडणाऱ्या घटनांमुळे अस्वस्थ अथवा प्रक्षुद्ध होत नाही तर तो ज्या दृष्टिकोनातून त्या घटनांकडे बघतो त्यामुळे तो अधिक अस्वस्थ होतो.
थोडक्यात कुठल्याही घटनेचा अर्थ आपण कसा लावतो यावर आपलं सुखदु:ख अवलंबून असतं. विशिष्ट प्रकारे विचार करण्यामुळे मनात तापदायक भावना निर्माण होतात आणि माणूस स्वत:ला त्रास करून घेतो. कुठलीही घटना घडल्यानंतर आपण आपल्या मनाशी जे स्वगत बोलतो ते खूप महत्त्वाचं असतं. इतक्या क्षणाला ती वाक्य आपल्या मनात चमकून जातात की त्याची जाणीवही आपल्याला नसते. त्याचे परिणाम मात्र आपल्या भावनांमधून, वर्तनांमधून व्यक्त होत असतात. म्हणजेच कुठलीही घटना आणि तिला अनुसरून निर्माण झालेल्या भावना किंवा वर्तन यांच्यामध्ये क्षणार्धात घडणारं असं हे स्वगत असतं. आपल्याला होणारा त्रास हा त्या घटनेमुळे नसून विचारांमुळे असतो तो त्रास टिकवून ठेवण्याचं काम ही स्वगतं म्हणजेच मनात घोळवलेली वाक्य करत असतात. प्रत्येकाचे स्वगत वेगवेगळे असते. आपल्या तापदायक भावनांचं, अस्वस्थतेचं प्रमाण त्याची तीव्रता कालावधी हे सारं स्वगतच ठरवत असतं, एखाद्या व्यक्तीबद्दलचा राग जेव्हा आपल्या मनामध्ये टिकून असतो तेव्हा त्याचं कारण त्या संदर्भातील वाक्य आपण दीर्घकाळ मनाशी घोळवत राहतो.
पहा हं, शामल काकूंनी त्यांचा मुलगा रितेशसाठी एक मुलगी पसंत करून ठेवली होती. एक दिवस त्यांनी रितेश समोर त्याच्या लग्नाचा विषय काढला पण त्याने मात्र आपण स्वत:च लग्न स्वत: ठरवल्याचे सांगितलं. शामल काकूंनी रितेश आणि राधाचं लग्न लावून दिलं खरं परंतु मनातून त्या खूप अस्वस्थ होत्या. पतीच्या निधनानंतर त्यांनी कष्टानं रितेशला मोठ केलं होतं. त्याच्या लग्नानंतर महिनाभरातच शामल काकूंना तीव्र डोकेदुखी जडली.
सुनेला बघितलं की त्यांची डोकेदुखी उफाळून यायची. ठराविक विचारांचं ते चक्र त्यांच्या डोक्यात फिरत राहायचं. वडिलांच्या मागे या रितेशला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपला खरा. सगळ्या हौशी बाजूला ठेवल्या. खूप कष्ट केले. याला शिकवलं. मुलाने चांगलेच पांग फेडले. मनासारखी सूनसुद्धा घरी आणली नाही. छोटीच तर अपेक्षा होती माझी! माझं काय चुकलं? मला नाही हे सगळं सहन होत! ही सारी वाक्य शामल काकू मनात घोळवत राहायच्या. त्यामुळे राधाबद्दलचा राग त्यांच्या मनामध्ये धुमसत राहायचा. या सततच्या त्यांच्या स्वगतामुळे त्यांना खूप मनस्ताप व्हायचाच आणि राधाचा सगळ्यांशी मिळून मिसळून वागण्याचा स्वभाव, तिची कामाची आवड, तिचं उच्च शिक्षण याकडे त्यांचे लक्ष कधी गेलंच नाही. आपल्या स्वगताची तर्कशुद्ध छाननी करणं खरंतर खूप गरजेचं असतं. ते केलं नाही तर मग मला वाटतं तेच बरोबर हा विचार दृढ होत जातो. कालांतराने मनस्ताप होतो. आपलं स्वगत तपासायला हवं. ते कसं हे पाहुया पुढच्या लेखात...
अॅड. सुमेधा संजीव देसाई