कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ठरवलं तर बदलता येतं...

06:30 AM Nov 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मागच्या लेखांमध्ये दिलेल्या उदाहरणानुसार शामल काकूंनी त्यांचा मुलगा रितेशसाठी एक मुलगी पसंत करून ठेवली होती. परंतु रितेशने आधीच राधाची निवड केल्याने त्या नाराज झाल्या होत्या. शामल काकूंनी रितेश आणि राधाचं लग्न लावून दिलं खरं परंतु मनातून त्या खूप अस्वस्थ होत्या. त्याच्या लग्नानंतर महिनाभरातच शामल काकूंना तीव्र डोकेदुखी जडली.

Advertisement

सुनेला बघितलं की त्यांची डोकेदुखी उफाळून यायची. ठराविक विचारांचं ते चक्र त्यांच्या डोक्यात फिरत राहायचं. वडिलांच्या मागे या रितेशला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपला खरा..सगळ्या हौशी बाजूला ठेवल्या. खूप शिकवलं. मुलाने चांगलेच पांग फेडले. मनासारखी सून सुद्धा घरी आली नाही. छोटीच तर अपेक्षा होती माझी. माझं काय चुकलं? मला नाही हे सगळं सहन होत. ही सारी वाक्य शामल काकू मनात घोळवत राहायच्या. त्यामुळे राधाबद्दलचा राग त्यांच्या मनामध्ये धुमसत राहायचा. या सततच्या त्यांच्या स्वगतामुळे त्यांना खूप मनस्ताप व्हायचाच आणि राधाचा सगळ्यांशी मिळून मिसळून वागण्याचा स्वभाव तिची कामाची आवड तिचं उच्च शिक्षण याकडे त्यांचे लक्ष कधी गेलं नाही. सततच्या या स्वगतामुळे राधाबद्दलचा राग त्यांच्या मनात धुमसत राहायचा.

Advertisement

आपलं जे स्वगत असतं त्या स्वगताची तर्कशुद्ध आणि वस्तुनिष्ठ छाननी किंवा परीक्षा केली जात नाही. त्यामुळे प्रत्येक जण आपला अनुभव, आपलं वाटणं हेच खरं आहे आणि तेवढेच बरोबर आहे, असं समजतो. अनेकदा एखाद्या घटनेचा अर्थ वस्तूस्थिती सोडून किंवा नाकारून लावलेला असतो तर काही वेळा वस्तूस्थितीचा विपर्यास केलेला असतो. त्यामुळे मूळ घटना किंवा प्रश्न लक्षात न घेता त्याच्याभोवती अशास्त्राrय आणि अनावश्यक अशी भावनिक जंजाळ निर्माण केली जातात. त्यामुळे मूळ प्रश्न जागीच राहतो. समस्या सुटत तर नाहीच परंतु अधिक जटील होत जाते. वरच्या उदाहरणाबाबतच बोलायचं झालं तर शामल काकूंनी राधाला सून म्हणून मनातून जसं स्वीकारलं नाही तसंच आपल्या रितेशचे हित कशात आहे हेही लक्षात घेतलं नाही. त्यामुळे त्यांचा पुढचा प्रवास थोडासा अवघड होऊन बसला. आपल्या गोंडस नातवंडांमध्येही त्या फारशा रमू शकल्या नाहीत किंवा आपल्याला मिळालेली सून सद्विचारी, कर्तृत्ववान आहे म्हणून मोकळेपणाने तिचे कौतुकही करू शकल्या नाहीत. वस्तुस्थिती मान्य न करता तिचा विपर्यास केल्यामुळे काय होतं याचे हे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे स्वगत तपासणी त्याची तर्कशुद्ध छाननी खूप गरजेची आहे.

कुठलीही घटना घडल्यानंतर आपण आपल्या मनाशीच जे स्वगत बोलतो ते खूप महत्त्वाचं असतं, हे लक्षात घ्यायला हवं. इतक्या क्षणार्धात ही वाक्य आपल्या मनात चमकून जातात की त्याची जाणीवही आपल्याला नसते.

त्याचे परिणाम मात्र आपल्या भावनांमधून, वर्तनातून व्यक्त होत असतात. म्हणजेच कुठलीही घटना आणि तिला अनुसरून निर्माण झालेल्या भावना किंवा वर्तन यांच्यामध्ये क्षणार्धात घडणारं हे स्वगत असतं. आपल्याला होणारा त्रास हा त्या घटनेमुळे नसून स्वगतामुळे, मनामध्ये घोळवत ठेवलेल्या त्या विचारांमुळे असतो. तो त्रास टिकवून ठेवण्याचं काम हीच स्वगत म्हणजेच आपल्या मनाशी बोललेली वाक्य करत असतात. आपली स्वगत आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असतात. आधी म्हटल्याप्रमाणे अनेक समजूती, मूल्य, मतं ही फारशी चिकित्सा न करता बऱ्याचदा आपल्या वडीलधाऱ्यांकडून जशीच्या तशी घेतो. त्यातूनही आपला दृष्टिकोन तयार होत असतो.

पहा काही वेळेला जेवत असताना कधीतरी असा प्रसंग येतो की जेवताना एखादा खडा दाताखाली येतो. बहुतेक सर्वांच्या अनुभवाची ही गोष्ट असते. पण श्यामच्या दाताखाली जरासा जरी खडा आला तर तो लगेच चिडतो आणि आपल्या बहिणीच्या, आईच्या अंगावरती ओरडतो. स्वयंपाक उरकायचा म्हणून उरकता. तुमचं धड लक्षच नसतं कशात. असं म्हणून पानावरून रागाने उठून जातो. याउलट राम मात्र शांतपणे तो बाजूला काढून ठेवतो आणि नेहमीप्रमाणे जेवायला लागतो. या दोघांच्या भिन्न प्रतिक्रिया मागचं कारण त्यांच्या वडिलांच्या स्वगतात किंवा वागण्यात सापडतं.

अनुभवातून दोघांनीही ते जसंच्या तसं स्वीकारलेलं असतं आणि प्रमाणभूत मानलेलं असतं. अशा असंख्य समजुती आपल्या मनात ठाण मांडून बसलेल्या असतात. कुठलीही घटना घडण्याचा अवकाश, वीज चमकावी इतक्या क्षणार्धात आपण ठराविक स्वगत बोलत असतो. एखादी व्यक्ती नापास झाली. कुठला अभ्यासच केला नसेल. साधं पास होता येत नाही मठ्ठच असणार! अशी अनेक वाक्य आपण स्वत:शीच बोलतो. कुठलीही शहानिशा न करता, वस्तुस्थिती लक्षात न घेता केवळ झालेल्या गोष्टींवरून निष्कर्ष काढून मोकळे होतो. परिणामी प्रश्नांचे खरे उत्तर आपल्याला सापडत नाही किंवा मुळात ते शोधायचा आपण प्रयत्न करत नाही. अनेकदा अविवेकी विचार समजुती मनात ठेवूनच घटनांचा अर्थ लावला जातो आणि आपण दु:खी होत राहतो.

थोडक्यात कुठल्याही घटनेचा अर्थ आपण कसा लावतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. विशिष्ट प्रकारे विचार करण्यामुळे मनात तापदायक भावना निर्माण होतात. घोळवत ठेवलेल्या स्वगतामुळे माणूस स्वत:ला त्रास करून घेतो. एक छोटंसं उदाहरण पाहुया, सीमा आणि मीनल या दोघी बालपणापासूनच्या मैत्रिणी. सीमाने आपली मैत्रीण मीनलला अगदी बालपणापासून तिच्या प्रत्येक टप्प्यावरती सहकार्य केलं, मदतीचा हात दिला. मीनलचं लग्न तसं लवकरच झालं. आर्थिकदृष्ट्या संपन्न घरामध्ये तिचा विवाह झाला. त्या दिवशी सीमा बाजारात जाताना बाजारामध्ये तिला मीनल दिसली परंतु त्या गर्दीमध्ये मीनलने मात्र सीमाला पाहिलेच नव्हते. त्यामुळे मीनल भराभर पुढे निघून गेली. सीमाच्या मात्र मनात आलं अशी काय ही, हिने ढुंकूनही पाहिले नाही. मी बालपणापासून हिला इतकी मदत केली आता मात्र ही विसरली. किती शिष्ट झाले आहे. लग्न झालं म्हणून काय झालं? कसली एवढी घमेंड? पूर्वी सतत बरोबर असायची माझ्या! घरी सुद्धा यायची. काय केलं नाही मी तिच्यासाठी? पण मोठ्या घरी पडल्याबरोबर केवढी बदलली! माणसं का बरं असे वागतात. कुणाला जीव लावू नये, म्हणतात ते अगदी खरं! पहा हं, खरं म्हणजे मीनल घाईत असल्यामुळे तिचे सीमाकडे लक्ष गेलं नव्हतं. त्यामुळे ती रस्त्यात थांबवून तिच्याशी बोलली नाही पण वस्तुस्थिती लक्षात न घेता सीमाने मात्र या घटनेचा जो अर्थ लावला त्याचे जे निष्कर्ष काढले. त्यामुळे तिच्याच मनात दुखावलेपणाची भावना निर्माण झाली आणि पुढे या खास मैत्रिणीसोबत अबोला धरण्यापर्यंत त्याचा प्रवास झाला. मुळात जे घडलंच नाही ते घडलं असं मानून सीमाने वास्तुस्थितीचा विपर्यास केला. त्याऐवजी मीना घाईत असेल तिचं माझ्याकडे लक्ष गेलं नसेल असा जर सरळ साधा विचार सीमाने केला असता तर झालेला मानसिक त्रास, गैरसमज, निर्माण झालेला दुरावा ती नक्कीच टाळू शकली असती पण सीमाने मीनलबद्दल जो दृष्टिकोन, समजूत मनामध्ये रुजवली होती ती अशी होती की तिला तर मी कायम मदत केली आहे आणि तिने हे खरंतर विसरायलाच नको. तिने माझी कायम दखल घेणं अत्यावश्यक आहे. मिनलच्या लक्ष न जाण्यामुळे सीमाच्या या समजुतीला धक्का बसला आणि तिने अशा प्रकारचा अर्थ लावला.

आपल्या मनात तापदायक भावना उत्पन्न होण्याच्या मुळाशी कोणत्या अविवेकी व अवाजवी समजूती आहेत का हे तपासले पाहिजे. त्या समजुतींच्या आधारांवर मनात घोळवत ठेवलेल्या स्वगताची छाननी केली तर अशा विचारांऐवजी अधिक विवेकपूर्ण विचार करणं शक्य असतं, असं आपल्या लक्षात येईल. सरावाने अशा समजूती व अविवेकी विचार ह्याला आपण बाजूला करून दृष्टिकोनामध्ये अपेक्षित बदल घडवू शकतो. तर्कशुद्ध किंवा विवेकपूर्ण विचार प्रश्न सोडवण्यास मदत करतात. योग्य आणि अयोग्य यांना एकमेकापासून वेगळं करण्याचं कौशल्य विकसित होतं. भावनेच्या भरामध्ये अगदी मनमानी कृती न करता जी परिस्थिती आहे तिच्या संदर्भासकट तारतम्याने विचार करून उचित निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते.

जोपर्यंत व्यक्ती चिंता वैरभावना घेऊन वावरणारी असते, तोपर्यंत तिच्या जीवनात आनंद आणि सुख प्रवेश करू शकत नाही. व्यक्तीच्या मानसिक स्वास्थ्यासाठी, समृद्ध जीवनासाठी स्वहिताची जाणीव असणं जसं आवश्यक असतं तसंच आत्मनियंत्रण, सहिष्णुता, बांधिलकी यांची गरज असते. विचारातील लवचिकता, आत्मपरिक्षण, आपले गुणदोष लक्षात घेऊन पुढे गेल्यास, स्वगताकडे लक्ष दिल्यास जीवनप्रवास सुकर व्हायला मदत होईल, हे मात्र निश्चीत!

अॅड. सुमेधा संजीव देसाई

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article