तुमचा तर मृत्यू झाला आहे!
लायसन्स मिळवू पाहणाऱ्या महिलेला मिळाले उत्तर
गॅथर्सबर्ग येथील रहिवासी पॉलिनो यांनी मेरीलँडमध्ये मोटर व्हीकल अॅडमिनिस्ट्रेशनच्या माध्यमातून लायसन्स नुतनीकरण करविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना एक टेक्स्ट मेसेज मिळाला, ज्यात त्यांची ओळख फेटाळण्यात आल्याचे नमूद होते, कारण शासकीय नोंदीनुसार त्या जिवंत नाहीत.
तीन मुलांची आई असलेल्या पॉलिनो हा मेसेज वाचल्यावर घाबरून गेल्या आणि त्यांना धक्काही बसला. यानंतर पॉलिनो यांना अंतर्गत महसूल सेवेकडून एक पत्र मिळाले, ज्यात त्यांना ‘मृत करदाता’ संबोधिण्यात आले होते.
सराकरी चुकीमुळे समस्या
स्थानिक टीव्ही स्टेशनने याप्रकरणी विविध शासकीय यंत्रणांना प्रश्न विचारल्यावर सोशल सिक्युरिटी अॅडमिनिस्ट्रेशनने ही चूक एका टाइपोमुळे झाल्याचे मान्य केले. एका अंत्यसंस्कारगृहाने अन्य कुणाचा मृत्यू नोंदविताना टाइपो मिस्टेक केली होती. कर्मचाऱ्याने सोशल सिक्युरिटी नंबरमध्ये एक चुकीचा क्रमांक नोंदविला होता. या चुकीमुळे पॉलिनो यांना मृत घोषित करण्यात आले.
स्वत:ला जिवंत सिद्ध करण्याची धडपड
पॉलिनो यांना या समस्येची थांगपत्ता नोव्हेंबर महिन्यात लागला. परंतु त्यांना जिवंत घोषित करण्यासाठी प्रशासनाला 14 जानेवारी 2025 पर्यंतची मुदत लागली. या चुकीचा प्रभाव पॉलिनो यांच्या जीवनावरही पडला आहे. त्यांची आरोग्य विमा सुविधा ठप्प झाल्याने त्यांना स्वत:च्या अस्थमासाठी इनहेलर खरेदी करण्यासाठी मोठ्या आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागले.
जीवनावर प्रतिकूल प्रभाव
या घटनेमुळे माझ्या जीवनावर अत्यंत वाईट प्रभाव पडला आहे. माझे आरोग्य आणि मानसिक स्थितीवरही प्रतिकूल प्रभाव पडला असल्याचे पॉलिनो यांनी सांगितले आहे. तर एसएसनने आमचे रिकॉर्ड अत्यंत अचूक असल्याचा दावा केला. दरवर्षी एसएसएला मिळणाऱ्या लाखो मृत्यूंच्या नोंदींपैकी 0.3 टक्के चुकीच्या असतात. हे प्रमाण 10 हजार चुकीच्या नोंदीइतके आहे.
पूर्वीही घडले आहेत प्रकार
पॉलिनो यांची ही घटना अनोखी नाही, सेंट लुइस, मिसौरीच्या मेडेलीन-मिशेल कारथेनला 2007 मध्ये चुकीच्या पद्धतीने मृत घोषित करण्यात आले होते आणि ही समस्या सुमारे दोन दशकांपर्यंत कायम होती. या चुकीमुळे मला महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करता आले नाही तसेच स्थायी नोकरीही करता आली नाही. स्वत:चे घरही खरेदी करू शकले नाही. ही चूक माझ्या जीवनाला प्रत्येक पावलावर रोखते. मी कधीकधी नोकरी मिळवू शकते, परंतु काही महिन्यांमधे समस्या उभी ठाकते असे कारथेनचे सांगणे होते. कारथेनने 2023 पर्यंत या समस्येसाठी संघर्ष जारी ठेवला होता.
शासकीय व्यवस्थेत सुधाराची गरज
शासकीय व्यवस्थेतील छोटी चूक देखील एखाद्याच्या जीवनाला पूर्णपणे प्रभावित करू शकते हे अशाप्रकारच्या घटनांमधून स्पष्ट होते. व्यवस्थेत आणखी सुधारांची गरज असल्याचे संकेत अशा घटनांमधून मिळत असतात.