यून येओल यांच्या सुटकेचा आदेश
वृत्तसंस्था / सोल
काही महिन्यांपूर्वी दक्षिण कोरिया या देशात आणिबाणी लागू करणारे आणि त्यानंतर पदच्युत करण्यात आलेले माजी अध्यक्ष यून सुक येओल यांची कारागृहातून सुटका करण्यात यावी, असा आदेश शुक्रवारी तेथील एका न्यायालयाने दिला आहे. येओल यांना जानेवारीत अटक करण्यात आली होती. त्यांनी अचानकपणे दक्षिण कोरियाची संसद भंग करुन देशात मार्शल लॉ लागू करण्याचा आदेश दिला होता. मात्र, त्यानंतर प्रचंड जनक्षोभ उसळल्याने त्याच्या दबावात येऊन त्यांनी आपला आदेश मागेही घेतला होता. तथापि, त्यांच्यावर महाभियोग चालविण्यात आला होता. या महाभियोगाच्या सुनावणीची कार्यवाही पूर्ण झाली असली, तरी अद्याप निर्णय देण्यात आलेला नाही. निर्णय होईपर्वंत त्यांना कारागृहात ठेवण्यात आले आहे. आता त्यांना कारागृहातून बाहेर काढण्याचा आदेश देण्यात आल्याने तेथे राजकीय खळबळ उडाली असून या निर्णयाविरोधात तेथील प्रशासन उच्च न्यायालयात अपील करण्याच शक्यता आहे.