यून सुक योल यांना अध्यक्षपदावरून हटविले
दक्षिण कोरियाच्या न्यायालयाचा निर्णय
वृत्तसंस्था/ सोल
दक्षिण कोरियाच्या सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्ष यून सुक योल यांना पदावरून हटविले आहे. यून सुक योल यांच्यावर देशात मार्शल लॉ लागू करणे आणि संसदेत सैन्य पाठविण्याचा आरोप आहे. 4 महिन्यांपूर्वी दक्षिण कोरियात मार्शल लॉ लागू केल्यावर राजकीय अस्थिरतेचा काळ सुरू झाला, ज्याच्या काही तासांनी अध्यक्षांनी मार्शल लॉ हटविण्याची घोषणा केली होती.
यून यांनी मार्शल लॉ लागू करण्यासाठी दिलेले प्रत्येक कारण अंतरिम मुख्य न्यायाधीश मून ह्युंग-बे यांनी शुक्रवारी निर्णय जाहीर करताना फेटाळले आहे. अध्यक्षांनी डिसेंबरमध्ये राजधानी सोशलच्या रस्त्यांवर सैनिक तैनात करून स्वत:च्या अधिकारांचा दुरुपयोग केला असल्याचे न्यायाधीशांनी म्हटले आहे.
कोरियन लोकांचा विश्वासाघात
यून सुक योल यांनी घटनात्मक संस्थांच्या अधिकाराला संपविण्यासाठी सैन्य आणि पोलीस दलांना जमविले आणि लोकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केले. या कृत्याद्वारे योल यांनी राज्यघटनेचे पालन करण्याच्या स्वत:च्या घटनात्मक कर्तव्याचा त्याग केला आणि कोरियन लोकांचा विश्वासघात केला. अशाप्रकारचे अवैध आणि घटनाबाह्या वर्तन राज्यघटनेच्या अंतर्गत सहन केले जाऊ शकत नसल्याचे न्यायाधीश मून यांनी म्हटले आहे.
दोन महिन्यांत होणार निवडणूक
दक्षिण कोरियाच्या प्रतिनिधिगृहाने 14 डिसेंबर रोजी यून यांच्यावर महाभियोग चालविण्यासाठी मतदान केले होते, परंतु यून यांना औपचारिक स्वरुपात अध्यक्षपदावरून हटविण्यासाठी घटनात्मक न्यायालयाच्या मंजुरीची आवश्यकता होती. सरकारकडे आता अध्यक्षीय निवडणूक घेण्यासाठी 60 दिवसांचा कालावधी आहे. अंतरिम अध्यक्ष हान डक-सू हे तोपर्यंत पदावर कायम राहणार आहेत.