For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मूळ स्वरूपाचे दर्शन झालेले योगी काळावर मात करतात

06:22 AM Sep 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
मूळ स्वरूपाचे दर्शन झालेले योगी काळावर मात करतात
Advertisement

अध्याय आठवा

Advertisement

भगवंत म्हणाले, योग्यासाठी अनादि काळापासून चालत असलेल्या दोन वाटा आहेत. त्यापैकी एक सरळ व एक आडमार्गाची आहे. आपल्या हिताकरिताच योग्य-अयोग्य पहावे, खरे-खोटे ओळखावे आणि आपले हित कशात आहे हे समजून त्याप्रमाणे वागावे. तसे केले नाही तर मरणकाळी धूम्रमार्गाचे मोठे संकट पुढे ठाकेल आणि जन्मभर ज्या हेतूने अभ्यास केला तो व्यर्थ होईल. अर्चिरादि मार्ग चुकल्याने जर धूम्रमार्गात वाट्याला आला तर संसाराच्या गाड्याला जुंपले जाऊन फिरतच रहावे लागेल. म्हणून माणसाने निरपेक्षतेने वाट्याला आलेले कर्म करून त्याचे फळ भगवंतांना अर्पण करून संन्यस्त वृत्तीने राहण्याचा प्रयत्न करावा. सदोदित ईश्वराच्या स्मरणात रहावे.

पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, हे दोन मार्ग जाणणारा योगी मोह पावत नाही. म्हणून अर्जुना तू योगयुक्त हो.

Advertisement

असे हे मार्ग जाणूनी योगी मोह न पावतो। म्हणूनि सर्वदा राहे योगाने जडिला चि तू ।।27 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, मरणकाळी अर्चिरादिमार्ग वाट्याला येतो की, धूम्रमार्ग वाट्याला येतो हे अनिश्चित आहे, हे समजल्यावर अर्जुन खिन्न झाला. ते पाहून भगवंत म्हणाले, देह जाऊन अर्चिरादिमार्गाने ब्रह्मप्राप्ती होईल अशी खात्री बाळगणे व्यर्थ आहे कारण कोणतीही चांगली गोष्ट आपोआप घडत नसते. त्यासाठी आटोकाट प्रयत्न करावे लागतात. व्यवहारातल्या किंवा प्रपंचातल्या गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न केल्यावर त्या मिळणे न मिळणे हे दैवाधीन असते परंतु ब्रह्मप्राप्तीसाठी केलेले प्रयत्न वाया न जाता फलप्रद होतात.

आपले मूळ स्वरूप ब्रह्माचे असून आत्मा हीच आपली खरी ओळख आहे पण त्यावर देहाचे आवरण चढलेले असते हे ओळखून देह राहो अथवा जावो, आपण आत्मस्वरूप आहोत ही खुणगाठ मनाशी बाळगावी. जेव्हा दोरीला आम्ही साप समजतो तेव्हा त्या दोरीवर सपर्पण आपण लादलेले असते. त्या दोरीला त्यामुळे काहीच फरक पडत नाही किंवा वाऱ्यामुळे पाण्यावर उठणाऱ्या लाटानी पाण्याला काहीच फरक पडत नाही ते पाणी जसेच्या तसेच असते. लाटेच्या व्यक्त होण्याने पाणी जन्मत नाही किंवा लाट नाहीशी झाली तरी ते पाणी मरत नाही. त्याप्रमाणे ज्यांना देहात असतानाच सर्व ब्रह्मव्याप्त आहे अशी अनुभूती आलेली असते. त्यांना देह असला काय आणि नसला काय काहीच फरक पडत नाही कारण त्यांना माहित असते की, सूर्यमार्ग हा त्यांच्यासाठी ठेवलेलाच आहे. देह पतनानंतर ते त्या मार्गाने जाणार आणि त्यांना ब्रह्मप्राप्ती होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यांना आपल्या मूळ स्वरूपाचे चालू जीवनातच दर्शन झालेले असते. आपण देवाला जाऊन आलो की, देवाचे दर्शन झाले असे म्हणतो परंतु दर्शन ह्या शब्दाचा अर्थ असा मर्यादित नाही. दर्शन म्हणजे ज्या दैवताचे दर्शन व्हावे असे आपणास वाटते त्यांची दिव्यशक्ती आपल्यात आल्याची अनुभूती आली की त्या दैवताचे दर्शन झाले असे म्हणता येईल. उदारणार्थ, मारुतीरायाची भक्ती करता करता त्याची शक्ती आपल्या अंगात आली अशी अनुभूती आली की, मारुतीरायाचे खरे दर्शन झाले असे म्हणता येईल.

Advertisement
Tags :

.