योगी प्राण आणि अपान ह्यांची गती रोधून यज्ञ करतात
अध्याय तिसरा
बाप्पा म्हणाले, यज्ञ करून कर्तव्यपूर्ती करणारे साधक देह प्रारब्धावर टाकत असतात. त्यांच्या देहाची व त्यांच्या प्रपंचाची काळजी मलाच करावी लागते. ते माझे यजन निरनिराळी साधने वापरून करत असतात. कोणी द्रव्याने, कोणी तपाने, कोणी ध्यानाने, कोणी तीव्र व्रताने आणि कोणी ज्ञानाने माझे यजन करतात. ह्या अर्थाचा द्रव्येण तपसा वापि स्वाध्यायेनापि केचन । तीव्रव्रतेन यतिनो ज्ञानेनापि यजन्ति माम् ।।34।। ह्या अर्थाचा श्लोक आपण पहात आहोत. बाप्पांनी सांगितल्याप्रमाणे, काही साधक प्रामाणिकपणे द्रव्य मिळवून त्यातील स्वत:पुरते घेऊन उरलेले गरजूंना दान करतात. ह्याला सत्पात्री दान असे म्हणतात. सगळ्यानाच द्रव्यदान करणे जमेलच असे नाही ते लोककल्याणकरी कार्ये करून समाजऋण फेडण्याचा प्रयत्न करतात. तपाचे कायिक, वाचिक, मानसिक असे तीन प्रकार आहेत. साधक त्या तिन्ही प्रकारातले नियम कसोशीने पाळून तपयज्ञ सिद्ध करत असतो. त्याबाबत भगवदगीतेच्या सतराव्या अध्यायात कोणते तप करताना काय काय करायचे असते ते भगवंतानी सांगितलं आहे. ते खालीलप्रमाणे, गुरू-देवादिकी पूजा स्वच्छता वीर्य-संग्रह । अहिंसा ऋजुता अंगी देहाचे तप बोलिले ।।14 ।। हितार्थ बोलणे सत्य प्रेमाने न खुपेलसे । स्वाध्याय करणे नित्य वाणीचे तप बोलिले।।15 ।। प्रसन्न-वृत्ति सौम्यत्व आत्म-चिंतन संयम । भावना राखणे शुद्ध मनाचे तप बोलिले ।। 16 ।।
ह्याप्रमाणे साधक तपाचरण साधक करून सात्विक होतात. सत्वगुणाची वाढ होण्यासाठी काही साधक कठोर व्रताचरण करतात. त्या काळात सात्विक आहार, सात्विक विचार आणि सात्विक वर्तणूक करतात. त्यामुळे त्यांच्यातील रज, तम गुण हळूहळू कमी होऊन सत्वगुण वाढू लागतो. निरंतर वेदाचे अध्ययन करून वेद पारायण करणे ह्याला स्वाध्याययज्ञ असे म्हणतात. निरंतर वेदाध्यायन केल्याने भाषाशुद्धी, वाकशुद्धी आणि मेधाशक्ती प्राप्त होते. एकाग्रता वाढते. मनाची चंचलता, अस्थिरता इत्यादि दोष कमी होऊन मन स्थिर व शांत होते. त्यात भगवंताचे प्रतिबिंब उमटते. ह्यात साधक ज्ञानरूप होऊन जातो. काही साधक सतत माझे ध्यान करून समाधीअवस्था साध्य करून घेतात. ते अंतिमत: माझे रूप होतात. हिमालयातील स्वानंदलोक हे माझे निवासस्थान आहे. तेथे ते श्री शंकर व पार्वती ह्या माझ्या मातापित्यासह मी राहतो. ज्यांना माझ्याशी एकरूप होण्याची संधी मिळते तेही माझ्याबरोबर स्वानंदलोकात राहतात.
काही योगी प्राण व अपान ह्यांची गती रोधून यज्ञ करतात. त्याबद्दल बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत. बाप्पा म्हणाले, प्राणे पानं तथा प्राणमपाने प्रक्षिपन्ति ये । रुद्ध्वा गतीश्चोभयोस्ते प्राणायामपरायणा ।।35 ।।
अर्थ-जे प्राण आणि अपान ह्या वायूंची गती रोधून प्राणवायूचा अपानवायुत आणि अपानवायूचा प्राणवायुत होम करतात ते प्राणायामपरायण योगी होतात. विवरण-पातंजल योगदर्शनामध्ये प्राणायामाची माहिती देताना भगवान पतंजली म्हणतात, प्राणायामाच्या माध्यमातून नैसर्गिकरीत्या चालू असलेल्या आपल्या श्वसन क्रियेवर ताबा मिळवता येतो. प्राणायामबाबत कोणतीही घाई न करता, आसन स्थिर झाल्यावर सावकाशीने याचा सराव करायचा आहे असे मुनी सांगतात. प्राणायामचे मुख्य प्रकार कोणते आणि त्यातील सूक्ष्म फरक काय आहेत याबाबत मुनी मार्गदर्शन करत आहेत. रेचकामध्ये फुफ्फुस्सातील वायू संथपणे आणि पूर्णतया बाहेर सोडायचा असतो. पुरकात बाहेरील प्राणवायू आत घ्यायचा असतो. फुफ्फुसात असलेला वायू बाहेरही सोडायचा नाही आणि बाहेरील वायू आतही घ्यायचा नाही याला कुंभक प्राणायाम असे म्हणतात.
क्रमश: