For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

योगी लोकांना देहाचा त्याग केव्हा करायचा हे समजत असते

06:28 AM Sep 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
योगी लोकांना देहाचा त्याग केव्हा  करायचा हे समजत असते
Advertisement

अध्याय आठवा

Advertisement

ईश्वरस्वरुपात मिसळून जाणे हे योग्याचे अथवा भक्ताचे सर्वोच्च ध्येय असते परंतु तेथपर्यंत पोहोचेस्तोवर ईश्वराची भक्ती करत त्याचे अनेक जन्म झालेले असतात. अशाप्रकारे ईश्वराशी अनन्य होण्याची तपश्चर्या तो करत असताना त्याने कोणत्या वेळेला देह ठेवावा म्हणजे त्याचे भले होईल ह्याबद्दल ईश्वराचे नियोजन असते. पुढील श्लोकात भगवंत कोणत्या काळी देहावसान झाले असताना योगी जन्ममरणापासून मुक्त होतात व कोणत्या काळी देहावसान झाले असताना पुन्हा जन्म पावतात ते सांगत आहेत.

कोण्या काळी कसा देह ठेवुनी येथ साधक । संसारी पडतो किंवा पावतो सिद्धि ऐक ते ।। 23 ।।

Advertisement

भगवंतांचे निजधाम अव्यक्ताच्याही पलीकडे असलेल्या अव्यक्तात असते. भगवंतांनी गीतेच्या चौथ्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे जेव्हा जेव्हा सज्जनांना दुर्जनांकडून त्रास होतो तेव्हा तेव्हा सगुण रुपात परमेश्वर अवतार घेतात. अवतारकाळात त्यांना भगवंत असे म्हणतात. ईश्वर निर्गुण, निराकार असून निजधामातून ते अखिल विश्वाचा व्यवहार चालवतात.

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, परमेश्वराच्या स्वरूपाबद्दल आपण जाणून घेतले तेच त्याचे निजधाम होय. ज्याचा योगाभ्यास पूर्ण झाला आहे अशा योगी लोकांना देह त्यांनी ठरवलेले कार्य पूर्ण झाले हे समजत असल्याने देहाचा त्याग केव्हा करायचा हे लक्षात आलेले असते. ते योग्य काळी देहत्याग करून निजधामी पोहोचतात.

माउलींच्या सांगण्याचा प्रत्यय श्रीगजानन महाराजांच्या चरित्रात येतो. त्यांच्या चरित्रात असा प्रसंग आहे की, ते पंढरपूरला जाऊन विठ्ठलाला विनवतात, देवा आता अवतारकार्य संपले असल्याने मी ऋषीपंचमीला निजधामास येण्यासाठी प्रयाण करू इच्छितो तरी परवानगी असावी. त्यानुसार त्यांनी ऋषीपंचमीला देहत्याग केला.

माउली पुढे म्हणतात काही कारणाने योग्याचा योगाभ्यास अपूर्ण असतानाच त्याचा देह अयोग्यकाळी पडला तर त्याला पुन्हा जन्माला यावे लागते. ह्याबद्दल भगवंतांनी सांगितले की, मद्रूप होणे आणि जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडणे ह्या दोन्ही गोष्टी मरणकाळी घडून येतात.

मद्रूप होणारा योगी देहत्याग करून मद्रूप कसा होतो हे आधी सांगतो. माणसाचे शरीर हे पंचमहाभूतांपासून तयार झालेले असते. मरणाची गुंगी प्राप्त झाली की, पंचमहाभूते आपापल्या वाटेने निघून जातात. मृत्यूसमयी त्याच्या बुद्धीला मी म्हणजे हा देह असा भ्रम होत नसल्याने त्याला देहत्याग करायचा म्हणून वाईट वाटत नाही.

अंत्यसमयी त्यांची स्मरणशक्ती जागृत असल्याने त्याला ईश्वराचे स्मरण होते. त्याचे मनही जिवंत असल्याने ईश्वराचे स्मरण करत देहत्याग करायचा हा विचार त्याच्या मनात पक्का असतो. हा सर्व इंद्रियसमूह मरणसमयी टवटवीत आणि ब्रह्मस्थितीची अनुभूती घेत असल्यामुळे प्रसन्न असतो. याप्रमाणे हा इंद्रियसमूह सावध असणे आणि त्याचा सावधपणा शेवटपर्यंत टिकणे ह्यासाठी आवश्यक ते अग्नीचे सहाय्य त्याला पुरेपूर मिळत असते.

क्रमश:

Advertisement
Tags :

.