योगभ्रष्ट योग्याला पुढील जन्म केव्हा घ्यायचा हे ठरवण्याचा अधिकार असतो
भगवंतांनी सांगितले की, शास्त्रशुद्ध पद्धतीने, चिकाटीने योगाभ्यास केला तर यश निश्चित मिळते. हे ऐकल्यावर अर्जुनाच्या मनात असा विचार आला की, सद्गुरूंच्या मार्गदर्शनाचा लाभ न मिळालेल्या साधकाने आत्मसिद्धी मिळवण्यासाठी श्रद्धेने योगाभ्यास सुरु केला तरी अपुऱ्या माहितीमुळे त्याचा योगाभ्यास पूर्ण होणे कठीण! त्यातच त्याचे आयुष्य संपले तर त्याने केलेल्या योगाभ्यासाचे त्याला कोणते फळ मिळते? त्याला धड इंद्रियसुखही मिळत नाही आणि मोक्षसुखालाही तो पारखा होतो.
अशा अवस्थेत त्याने केलेला योगाभ्यास वाया जातो की काय? त्यावर भगवंत म्हणतात, पार्था, इहलोकी अथवा परलोकी, शुभकर्म करणारा दुर्गतीला जात नाही. मोक्षसुखासाठी प्रयत्न करणे हे तर सगळ्यात मोठे शुभकर्म असल्याने त्याला त्याचे फळ मिळणार नाही असं कसं होईल? त्याला ते नक्की मिळते पण काही काळ विसावा घ्यावा लागतो एव्हढेच, अपेक्षित वेगाने अभ्यास न झाल्यामुळे थोडा विसावा घेतल्यानंतर मोक्ष त्याच्याकरता ठेवलेलाच असतो.
अशा साधकाला पुढील गती कोणती मिळते ते सांगताना भगवंत म्हणाले, शुभकर्म करणारा मृत्यूपश्चात पुण्यकर्मीयांच्या लोकाला जातो. तेथे पुष्कळ वर्षे वास केल्यावर शुद्धाचरणी व धनवान अशा कुळामध्ये तो योगभ्रष्ट जन्म पावतो.
पुण्य-लोकांत राहूनि तो योग-भ्रष्ट संतत । शुचि साधनवंतांच्या घरी जन्मास येतसे ।। 41 ।।
श्लोकाच्या विवरणात भगवंतांच्या सांगण्यावर भाष्य करताना माउली म्हणतात, योगाभ्यास करणाऱ्याचा मध्येच मृत्यू ओढवल्यास त्याचा योगाभ्यास जरी अपुरा राहिला तरी त्याने केलेल्या प्रयत्नामुळे त्याला शंभर यज्ञ केल्याचे पुण्य मिळते. ह्यावरून योगाभ्यास करणे हे किती थोर आहे हे लक्षात येते. त्या पुण्याच्या आधारे त्याला स्वर्गातील दिव्य भोग हवा तेव्हढा काळ भोगायला मिळतात. त्याने पुढील जन्म केव्हा घ्यावा हे ठरवण्याचा अधिकार त्याला असतो.
इतरांच्या बाबतीत ते नियती ठरवत असते पण साधकाने योगाभ्यास करून मिळवलेल्या जबरदस्त पुण्याईमुळे तो म्हणेल त्याला नियती हो म्हणते. स्वर्गातील दिव्य भोग भोगत, हवा तेव्हढा काळ तो तेथे काढू शकत असला तरी त्याचा मुळचा स्वभाव विषयसुखात रमणारा नसल्याने त्याला त्या नाशवंत सुखाचा कंटाळा येतो, एव्हढेच नव्हे तर योगाभ्यासातून मिळणाऱ्या अत्युत्तम सुखाची त्याला वारंवार आठवण येत असल्याने हा प्रसंग देवाने आपल्यावर का आणला असेही त्याला वाटत असते. स्वर्गातील सुख नकोसे झाले की, तो मनुष्यलोकात जन्मतो. जेथे सर्व धर्म जोपासले जातात अशा उत्तम कुळात त्याला पुढील जन्म मिळतो आणि तेथे त्याची जोपासना एखाद्या भाताच्या रोपाप्रमाणे काळजीपूर्वक केली जाते.
ते कुळ अत्यंत पवित्र आणि श्रीमंत असते. ते नीतीच्या मार्गाने चालते, सत्याने पवित्र झालेले बोलते आणि शास्त्रदृष्टीने पाहते. त्या कुळात वेद हे जागृत दैवत असते, शास्त्रात सांगितल्यानुसार त्या कुळाचे आचरण असल्याने सारासार विचार करून वर्तन केले जाते. त्या कुळामध्ये सतत ईश्वराचे चिंतन चालू असते. आपल्या पुण्याईच्या जोरावर त्या कुळात तो योगभ्रष्ट सुखाने जन्म घेतो.
क्रमश: