योगी परब्रह्मसुखाशी एकरूप झालेला असतो
अध्याय पाचवा
विरक्त पुरुष विषयातून सुख मिळते ह्या कल्पनेशी कधीही सहमत होत नसल्याने ते त्यांचा त्याग करतात. विषयांवर मात करण्यासाठी जसं आयुष्य वाट्याला येईल तसं जगण्याची सवय करून घेणं फार महत्त्वाचं असतं. ज्यांना आत्मज्ञान झालंय त्यांना हे नेहमीच शक्य होतं. वाट्याला येईल तसं आयुष्य न कुरकुरता जगणे हे योग्याचे प्रमुख लक्षण आहे.
प्रयत्ने मरणापूर्वी ह्या देही जिरवू शके । काम-क्रोधातले वेग तो योगी तो खरा सुखी ।। 23 ।।
हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. त्यानुसार काम आणि क्रोध ह्यांचा माणसावर होणारा हल्ला अत्यंत वेगवान असतो. तो परतवून लावण्यासाठी निरिच्छ असणं आवश्यक असतं. निरिच्छ असलेला योगी हा हल्ला सहन करू शकतो त्यामुळे तो कायम सुखी असतो. इतरांना विषयसुखाचे आकर्षण वाटत असल्याने त्यांना त्यासंबंधी इच्छा होतात आणि त्या तृप्त न झाल्याने राग येतो मात्र योग्यांना विषयसुखाचे आकर्षण नसते कारण त्यांनी त्याहीपेक्षा कितीतरी श्रेष्ठ असलेले ब्रह्मसुख अनुभवलेले असते. योग्यांना विषयसुखाचे आकर्षण वाटत नसल्याने ते मिळाले तर ते त्याचा आनंद घेतात पण जर मिळाले नाहीत तर त्यांना वाईट वाटत नाही. कायम अमृत प्यायला मिळालेले आहे तो उसाच्या रसाची अपेक्षा कशाला करेल किंवा तो मिळाला नाही म्हणून कशाला रागवेल?
पुढं आणखी एक वेगळा मुद्दा माउली मांडतात तो असा, ते म्हणतात, पक्षी फळ खाताना बघितला की, फळ खाणारा पक्षी, तो खात असलेले फळ आणि फळ खाण्याची क्रिया ह्या तीन गोष्टी स्पष्ट जाणवतात. ह्याला आध्यात्मिक भाषेत त्रिपुटी असं म्हणतात. मात्र ब्रह्मसुख अनुभवताना ब्रह्मसुख अनुभवणारा मी, ब्रह्मसुख आणि मी ते अनुभवतो आहे हा विचार अशी त्रिपुटी जाणवत नाही कारण ब्रह्मसुख अनुभवणारा योगी त्या सुखाचा साक्षीदार म्हणून ते अनुभवत नाही तर त्या सुखाशी एकरूप होऊन ते अनुभवत असतो. त्यामुळे त्याला ब्रह्मसुखाचा अनुभव शब्दात सांगता येत नाही.
त्याची अपूर्वाई किती असते ते तुकाराम महाराज त्यांच्या अभंगातून सांगताना म्हणतात, एकदा विठ्ठलभक्तीतून परब्रह्माच्या सुखाचा नाद लागला की, त्याची एव्हढी हाव सुटते की, त्यापुढे इतर सुखे सामान्य वाटू लागतात. महाराज म्हणतात, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ।।1।। येणें सुखे मन जालें हांवभरी । परती माघारीं घेत नाहीं ।।2।। बंधनापासूनि उकलल्या गांठी । देतां आली मिठी सावकाशें ।।3।। तुका म्हणे देह भारिला विठ्ठले ।कामक्रोधे केले घर रीते ।।4।। विठ्ठलभक्तीच्या नादामुळे परब्रह्माचे सुख चाखायला मिळते त्यामुळे काम, क्रोध हे विकार सोडून जातात. त्यामुळे मी कर्ता आहे ह्या अहंकाराला खतपाणी घालणारा विचार मनातच येत नाही. मी कर्ता आहे हा अहंकार सामान्य माणसाच्या मनात सदैव जागृत असतो. मनुष्य आणि ब्रह्मसुख ह्यात हा अहंकाराचा पडदा असल्याने तो सामान्य माणसाची आणि ब्रह्मसुखाची गाठ पडू देत नाही. योग्याने मात्र तो पडदा दूर करण्यात यश मिळवल्याने तो ब्रह्मसुखाला गाढ आलिंगन देऊन बसतो. पाण्यात पाणी मिसळले तर आधीचे पाणी कोणते आणि नंतर मिसळलेले कोणते हे सांगता येत नाही.