योगी आदित्यनाथ यांचा वाढदिन साजरा
वृत्तसंस्था/लखनौ
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे 53 वर्षांचे झाले असून त्यांचा बावन्नवा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. गुरुवारी त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त 53 किलो वजनाचा लाडू केक भगवान हनुमानाला अर्पण केला आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हनुमान चालिसाचे सामुहिक पारायण करण्यात आले. हा कार्यक्रम लखनौमधील वरदअंजनेय हनुमान मंदिरात साजरा करण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभागी होते.
कार्यकर्त्यांनी या निमित्ताने 53 किलो लाडूंचा एक केक लखनौतील 51 फूट उंचीच्या भगवान हनुमानाच्या प्रतिमेला अर्पण केला. या मूर्तीच्या शेजारी आदित्यनाथ यांचे एक प्रतिमाचित्रही ठेवण्यात आले होते. नंतर हा केक लोकांना वाटण्यात आला. योगी आदित्यनाथ हे 2017 पासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने 2022 ची विधानसभा निवडणूक जिंकली होती. 2017 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा प्रचंड विजय झाल्यानंतर त्यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली होती. वयाच्या 45 व्या वर्षी ते उत्तर प्रदेशचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले होते.