आंतरराष्ट्रीय माउंटन सायकलिंग स्पर्धेसाठी योगेश सोनवणेची निवड
चीनमध्ये होणार स्पर्धा : स्पर्धेसाठी निवडलेला पहिला महाराष्ट्रीयन खेळाडू
प्रतिनिधी/ नाशिक
घरात अठरा विश्व दारिद्रय.. आई-वडील शेतमजूर.. रहायला छोटीशी झोपडी.. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अंतापूर-ताहाराबाद (जि. नाशिक) येथील एका आदिवासी कुटुंबातील योगेश नामदेव सोनवणे या 17 वर्षीय विद्यार्थ्याने अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय माउंटन (बाइक) सायकलिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्य व कांस्य अशी दोन्ही पदके मिळवून मविप्रच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेतील कामगिरीमुळे त्याची चीनमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय माउंटन बाइक सायकलिंग चॅम्पियनशिपमध्ये 18 वर्षांच्या आतील मुलांच्या गटात निवड होणारा योगेश सोनवणे हा पहिला महाराष्ट्रीयन खेळाडू ठरला आहे.
सायकल फेडरेशन ऑफ इंडिया आणि हरियाणा सायकलिंग स्टेट असोसिएशन यांच्या वतीने मोरनी हिल्स (हरियाणा) येथे दि. 28 ते 31 मार्च दरम्यान 21 व्या सिनियर, ज्युनियर आणि सब ज्युनियर राष्ट्रीय माउंटन (बाइक) सायकलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 18 वर्षांखालील वयोगटामध्ये योगेश सोनवणेने अप्रतिम कामगिरी करीत क्रॉस कंट्रीमध्ये कांस्य आणि टीम रिलेमध्ये सिल्वर या दोन्ही पदकांवर आपले नाव कोरले. या स्पर्धेतील यशस्वी कामगिरीमुळे एशियन सायकलिंग फेडरेशनच्या वतीने दि. 23 ते 27 एप्रिल दरम्यान चीनमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आशियाई माउंटन (बाइक) सायकलिंग स्पर्धेसाठी योगेशची निवड झाली आहे. सोमवारी (दि. 14) तो चीनला रवाना होणार आहे.