For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निरोगी जीवनासाठी योगसाधना महत्त्वाची!

10:12 AM Jun 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
निरोगी जीवनासाठी योगसाधना महत्त्वाची
Advertisement

आरोग्याच्या तक्रारींवर आसनांचे फायदे

Advertisement

बेळगाव : स्वस्थ आरोग्यासाठी व्यायाम आणि योगसाधना आवश्यक आहे. मात्र, या दोन्हींमध्ये फरक आहे. व्यायामामुळे शरीर निरोगी राहू शकते. मात्र, योगामुळे शरीर आणि मनही निरोगी राहते. परंतु, अलीकडे आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. शिवाय तरुणाईला वेगवेगळे विकार जडत आहेत. त्यातही मान, पाठ, कंबर आणि गुडघेदुखी यांचे प्रमाण वाढले आहे. या सर्व विकारांवर कोणती आसने महत्त्वाची आहेत? व त्यांचे फायदे काय? याची माहितीही मन्नोळकर यांनी दिली आहे.

योग : कर्मसु कौशलम्

Advertisement

म्हणजेच कुशलतापूर्ण काम करणे हाच योग होय. तसेच समतत्व योग उच्चते म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत अनुकूल किंवा प्रतिकूल, यश किंवा अपयश असो, स्थिर राहणे महत्त्वाचे होय. योगसाधना महत्त्वाची आहे. परंतु, निरंतरता, सातत्य आणि एकाग्रता या तिन्हींचा नित्य अवलंब केला गेला तरच योगाचा फायदा होणार आहे. पतंजलीचे प्रणेते बाबा रामदेव महाराज यांनी योग जनाभिमुख केला. तंजलीचे उत्तर कर्नाटक राज्य प्रभारी किरण मन्नोळकर यांच्या पुढाकाराने या शाखा कार्यरत आहेत. त्यांच्या मते आज सर्वांना सुख, संपत्ती हवी आहे. परंतु, जर रोग नको असतील तर योग हेच उत्तर आहे. योगाचे काही यम आणि नियम आहेत.

यम म्हणजे अहिंसा. ती केवळ शारीरिक नव्हे तर शाब्दिक आणि मानसिकसुद्धा नको, हा विचार आहे. नियम म्हणजे शुद्धी, संतोष म्हणजेच काम करताना अपेक्षा नको तर आनंद हवा. तप म्हणजे ध्येयाकडे जाताना विचलित न होणे आणि स्वाध्याय म्हणजे सकारात्मकता वाढविणे, हे सर्व योगाचे बाह्यारंग आहेत. तर अंतरंग म्हणजे धारणा, ध्यान, समाधी. धारणा म्हणजे अवयवांवर लक्ष ठेवणे, ध्यान म्हणजे ध्यानस्थ होणे आणि या दोन्हींच्या माध्यमातून समाधी अवस्थेला पोहोचणे होय. आसन, प्राणायाम, प्रत्यहार यांना योगामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्यहार म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे.

प्राणायाममुळे शरीरातील सर्व अवयवांचे शुद्धीकरण होऊन ते पुन्हा बळकट होतात. श्वसन तंत्राच्या शुद्धीकरणामुळे रक्ताभिसरण सुरळीत होते. योगाला अध्यात्माची बैठक आहे. नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाणे हेच अध्यात्म होय. मात्र, काही बाधक तत्त्वांना दूर ठेवणे आवश्यक आहे. ही तत्वे म्हणजे अत्याहार, अत्याश्रम आणि अति बोलणे ही होत. अत्याहार म्हणजे अति खाणे, अति श्रम करणे, अति बोलणे ही सर्व बाधक तत्वे आहेत. योग केवळ समजून घेऊन उपयोग नाही तर ती एक जीवनशैली आहे. ती कृतीत आणणे आवश्यक आहे.

मार्जरासन

या आसनावेळी दोन्ही पाय आणि गुडघे मांजर जसे बसते त्या पद्धतीने बसावे. नंतर मान वर करून श्वास घेत पाठ खाली आणावी. तसेच श्वास सोडत डोके खाली करून पाठ व कंबर वर करावी. यामुळे मेरुदंडाला व्यायाम मिळतो आणि त्याचा पाठ आणि कंबरेलाही लाभ होतो.

मकरासन

दोन्ही पायात अंतर ठेवून पोटावर पालथे झोपावे. पायांच्या चवड्यांचा वरचा भाग जमिनीला स्पर्श करेल, अशी स्थिती असावी. हात डोक्यावर सरळ नेऊन कोपरामध्ये दुमडून उजव्या हाताने डाव्या हाताचा व डाव्या हाताने उजव्या हाताचा दंड पकडावा. तोंड जमिनीकडे असावे. म्हणजे खांद्यापर्यंतचा भाग, पोट, मांड्या व पायाच्या चवड्याचा वरचा भाग जमिनीला एका सरळ रेषेत स्पर्श करेल. यामुळे शरीरातील आळस नाहीसा होतो व मेरुदंडालाही आराम मिळतो.

भुजंगासन

पाठीसाठी हे आसन उपयुक्त आहे. पालथे झोपून हनुवटी छातीला टेकवावी. कपाळ जमिनीवर टेकवून शरीर हलके करून हाताचे पंजे छातीजवळ आणून नंतर हाताच्या पंजावर शरीराचा भार देऊन बेंबीपासून वरचा भाग हळूहळू वर उचला. बेंबीपासून खालचा भाग हलू न देता कमरेच्या वरच्या शरीरास म्हणजेच पाठीस बाक येईल. परिणामी पोटातील सर्व स्नायूंवर चांगला ताण पडेल. त्याने अपचनाची व मलावरोधाची तक्रार नाहीशी होईल. लवचिकपणा वाढेल. पोटातील स्नायू कार्यक्षम होऊन पोटदुखीचा विकार नाहीसा होईल. शिवाय खांदे, मान आणि मस्तकाचा भाग मजबूत राहील.

शलभासन

पोट, जठर, पित्ताशय यासाठी अत्यंत उपयुक्त आसन. या आसनावेळी जमिनीवर हनुवटी टेकवून पालथे झोपावे. हात अंगापाशीच ठेवावेत. अंगठा आणि तर्जनी जमिनीवर टेकवलेल्या अवस्थेत ठेवून बाकीची बोटे वळवून संपूर्ण शरीर ताठ करावे आणि पाय वर उचलावेत. गुडघ्यात पाय वाकू देऊ नका. पायाचे चवडे ताणा व मांड्या आणि ओटीपोटाचा भाग वर उचला. यामुळे मांड्या, पोट आणि पायांचे स्नायू मजबूत होतात. जठाराग्नी प्रज्वलित होतो. पायावरील सूज कमी होते. मूतखडा, मधुमेह व तत्सम तक्रारी कमी होतात. फुफ्फुसाचे विकार दूर होतात. जठर, पित्ताशय, प्लिहा मजबूत होतात.

पाठीसाठी आसन: पवन मुक्तासन

सरळ पाठीवर झोपा. दोन्ही पायांचे चवडे व टाचा जुळवून घेऊन, छातीमध्ये श्वास रोखून घेऊन उजवा गुडघा पोटाकडे खेचावा. दोन्ही हातांनी पोटावर दाबून ठेवावा. त्यानंतर मस्तक जमिनीपासून वर उचलून गुडघ्याला तोंड लावण्याचा प्रयत्न करावा. उजव्या पायाच्या मांडीने पोटाच्या उजव्या बाजूच्या स्नायूवर दाब द्या. याच प्रमाणे डाव्या पायाने ही क्रिया करावी. या दोन्ही क्रिया एकाच वेळी केल्यास पवन मुक्तासन पूर्ण होते. या आसनामुळे गुदद्वारातून असणारा वायू मुक्त होतो. शरीराचा स्थूलपणा कमी होऊन पोटातील चरबी कमी होते. याशिवाय ओटीपोटाचे रोग, गर्भाशयाचे रोग, मूळव्याध, रक्तदोष कमी होतात.

सेतूबंधासन

प्रथम पाठीवर झोपावे. गुडघे वाकून कंबर आणि नितंबाचा भाग जमिनीपासून वर उचलावा. याचवेळी डोके, मान व खांदे मात्र जमिनीवर टेकलेले असावेत. याचा सराव होईपर्यंत ते प्रारंभी सहा ते आठ सेकंदापर्यंतच करावे. यामुळे कंबर व नितंबामध्ये निर्माण होणाऱ्या विकृती दूर होतात. खांदे, मान, हाताचे कोपरे व पंजातील सांध्यांना चांगला व्यायाम मिळतो. वायू विकार आणि अजीर्ण विकार दूर होऊन पाठीच्या कण्याला लवचिकता येईल.

उत्तानपादासन

शरीरातील स्थूलपणा कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहे. प्रथम पाठीवर सरळ झोपावे. दोन्ही हात बाजूला ठेवून पायाच्या टाचा व चवडे जुळवून पाय सरळ स्थितीत ठेवून श्वास आत खेचत हळूहळू पाय वर उचलावेत. प्रारंभी चार वेळा व नंतर पाच ते सहा वेळा करावे. याचा फायदा म्हणजे सर्व स्नायूंना चांगला व्यायाम मिळतो. पचनशक्ती सुधारते. चरबी कमी होते. पोटातील कृमी नाहीसे होतात. पाठ व कंबरेचे दुखणे कमी होते. मूळव्याधची सुरुवात असेल तर ती दूर होते. हे सर्वांगासनाची पूर्वतयारी आहे.

कटिआसन

कंबर आणि पोटाचे विकार दूर करण्यासाठी हे आसन उपयुक्त आहे. ते अवघड असले तरी सरावाने शक्य होते. यामध्ये पाठीवर उताणे झोपून दोन्ही पाय वर करून डाव्या हाताने डाव्या पायाचा व उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडावा. पाय ताठ ठेवावेत. कंबर आणि डोके जमिनीला टेकायला हवे. या स्थितीत किमान दहा सेकंद राहावे. यामुळे कंबरेच्या सर्व तक्रारी व व्याधी दूर होतात. फुफ्फुस आणि खांदे मजबूत होतात. हृदय कार्यक्षम होते व हृदयरोगास प्रतिबंध होतो.

धनुरासन

पोटावर पालथे झोपून कपाळ जमिनीवर ठेवावे. दोन्ही हात बाजूला ठेवून गुडघ्यापासून पाय मागे दुमडावे. हात वर उचलून दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे घोटे धरून छाती आणि डोके वर उचलावे. जेणेकरून बहिर्गोल कमानीप्रमाणे दिसेल. या आसनामुळे पोटाला चांगला मसाज मिळतो. जठराचे विकार दूर होतात. पाठीचे कुबड नाहीसे होते. संधिवात कमी होतो. चरबी कमी होते. मेरुदंड लवचिक होतो. हाडांना मजबुती मिळते. मुख्य म्हणजे आळस कमी होतो. स्त्रियांसाठी हे आसन खूप फायदेशीर आहे. कारण मासिक पाळीच्या व प्रजनन तंत्राच्या तक्रारी कमी होतात.

Advertisement
Tags :

.