योग समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतिक!
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : राज्यभरात लाखो लोकांचा उत्स्फूर्त सहभाग
पणजी : देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतिक असलेल्या योगामुळे शरीर निरोगी आणि मन शांत राहण्यात मदत झाली आहे. संतुलित आरोग्य आणि जीवनासाठी योगाला अनन्यसाधारण महत्त्व असून योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त काल रविवारी ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आयोजित प्रमुख कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, क्रीडामंत्री रमेश तवडकर, मुख्य सचिव डॉ. व्ही कंदवेलू, क्रीडा संचालक अजय गावडे, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्रत्येक घरात योग व्हावा : मुख्यमंत्री
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यभरात शेकडो ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या माध्यमातून किमान लाखभर लोकांनी त्यात सहभाग घेतला. योग या क्रियेला प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळेच योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे दि. 21 जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून घोषित करण्यात आला. आरोग्यदृष्ट्या समाज सक्षम बनण्यासाठी योग हा प्रत्येक घरात, प्रत्येक विद्यालयात, प्रत्येक कार्याच्या स्थळी, पोहोचवून गोमंतकीयांच्या जीवनपद्धतीचा भाग बनला पाहिजे, असे पुढे बोलताना डॉ. सावंत यांनी सांगितले.
योग म्हणजे संतुलित जीवनशैली : नाईक
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी बोलताना, सरकारकडून आता लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी ‘हेल्थ विथ आयुर्वेद’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली योग हे आता एक ‘जनआंदोलन’ बनले आहे. त्यामुळे योग हा केवळ एक ‘व्यायाम’ न राहता संतुलित जीवनाची शैली बनली आहे, असे प्रतिपादन केले.
आरोग्य, विचार महत्त्वाचे : तवडकर
क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी बोलताना, सुदृढ आरोग्य आणि मन शांत राहण्यासाठी योग आवश्यक असून विकसित भारताच्या उभारणीत प्रत्येकाचे आरोग्य आणि विचार म्हत्त्वाचे ठरतात, असे प्रतिपादन केले. हजारोंच्या संख्येने उपस्थित लोकांच्या सोबतीने मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आदींनी योग प्रात्यक्षिकांमध्ये भाग घेतला. त्यावेळी संदेश बाराजणकर, सोहम पाटकर, नंदिनी, रफिक या योगप्रशिक्षकांनी सर्वांना मार्गदर्शन केले. त्याशिवाय विद्युत लोटलीकर या 13 वर्षीय विद्यार्थ्याने विशेष योगासने सादर केली. तसेच पर्वरी येथील जिम्नास्टिक अकादमीच्या पथकानेही सांघिक प्रात्यक्षिके सादर केली.
मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधींचा सहभाग
राज्यभरात प्रत्येक तालुक्यात आणि मतदारसंघांमध्ये शाळा, विद्यालये, मंदिरे, पंचायत सभागृह आदी ठिकाणी योग प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यात सर्व ठिकाणी लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व सहभाग लाभला. प्रत्येक ठिकाणी त्या त्या भागातील आमदार, मंत्री, अन्य लोकप्रतिनिधी यांनी उपस्थिती लावली. कुंडई येथे तपोभूमीवर आयोजित कार्यक्रमात प. पू. ब्रह्मेशानंद स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली अनुयायींनी सहभाग घेतला. त्यावेळी बोलताना त्यांनी, गोव्याला मोठे आध्यात्मिक संचित लाभले असल्याने गोवा म्हणजे केवळ समुद्र किनारे व पर्यटन एवढीच ओळख न राहता यापुढे गोवा म्हणजे ऋषीमुनींची भूमी, योगभूमी अशी ओळख निर्माण झाली पाहिजे, असे प्रतिपादन केले.
गोव्याला ‘योग राज्य’ घोषित करावे : ब्रह्मेशानंद स्वामी
त्यासाठी सरकारने विधानसभेत चर्चा करून गोवा हे ‘योग राज्य’ म्हणून जाहीर करावे, याकामी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, असे निवेदन ब्रह्मेशानंद स्वामी यांनी केले. डॉ. सावंत यांच्या कार्यकाळातच योग, आयुर्वेद, संस्कृत भाषा, गोमाता यांचा मोठ्या प्रमाणात प्रचार-प्रसार होऊ लागला आहे, असेही त्यांनी नमूद केले.
सरकारकडून कृतज्ञता व्यक्त
राज्यात रविवारी आयोजित करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम म्हणजे आरोग्य आणि सुदृढ जीवनशैलीबाबतचा लोकांचा उत्साही सहभाग यांचे एक उल्लेखनीय उदाहरण ठरले आहे. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून एक लाखापेक्षा जास्त लोकांनी नोंदणी केली होती, अशी माहिती सरकारी पत्रकातून प्राप्त झाली आहे. या सोहळ्यात विविध संस्था आणि खात्यांतर्फे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यात प्रामुख्याने पतंजली योग समिती, स्वयंसेवी संस्था आणि अन्य संघटनांतर्फे तब्बल 1,230 ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले. त्याशिवाय राजकीय पक्ष आणि मतदारसंघ स्तरावर 80 पेक्षा अधिक कार्यक्रम झाले. क्रीडा खात्याने 12 ठिकाणी, तसेच ‘आयुष’ खात्याच्या मार्गदर्शनाखाली राज्यात विविध ठिकाणी योग सत्रे आयोजित करण्यात आली. लोकांचा हा प्रतिसाद पाहता प्रत्येकामध्ये शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी योगाच्या महत्त्वाबद्दल जागऊकता वाढल्याचे स्पष्ट होते. या उत्स्फूर्त सहभागामुळे यंदाचा सोहळा राज्यातील सर्वात यशस्वी आणि सर्वसमावेशक सोहळ्यांपैकी एक ठरला आहे. त्याकामी योगदान दिलेल्या सर्व संस्था, स्वयंसेवक, विविध मंडळे आणि नागरिकांबद्दल गोवा सरकारने कृतज्ञता व्यक्त केली आहे.