जिल्हा प्रशासनाच्यावतीने योग दिन
बेळगाव : योगासनाला वैद्यकीय क्षेत्रातही महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रतिदिनी योगासने केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्याबरोबरच शरीरातील आजार दूर होऊ शकतात. त्याचबरोबर मन एकाग्र होण्यास मदत होते, असे मत केंद्रीय ग्राहक व्यवहार व अन्न-नागरी पुरवठामंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केले. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महापालिका बेळगाव व जिल्हा आयुष खाते यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 21 रोजी सुवर्णसौध आवारात 12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीयमंत्री जोशी बोलत होते. आजच्या बदलत्या जीवनशैलीत आरोग्य उत्तम राहण्यासाठी योगासने नित्यनियमाने करणे आवश्यक आहे. स्पर्धात्मक युगात आपल्या दैनंदिन कामामध्ये कौशल्य साधण्यासाठी योगासने उपयोगी ठरू शकतात. आसनांची माहिती योग्यरितीने करून घेऊन योगासने केली पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
योगासन म्हणजे गोल्डन रिंग
दिवसातील 24 तासांपैकी जगातील कोणत्याही एका भागात योगासंबंधीचा अभ्यास सुरू असतो. त्यामुळे योगासनाला गोल्डन रिंग असे म्हटले आहे. योगासनामुळे शरीर आणि मन उत्तम राहण्यास मदत होते. प्रत्येकाने योगासने ही दिनचर्या बनवून सुदृढ आरोग्य, सुदृढ राष्ट्र निर्माणासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हणमंत कोंगाली, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, महापालिका आयुक्त कार्तिक एम., प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी रोहित सिंग, जिल्हा आयुष अधिकारी श्रीकांत सुनधोळी, विविध शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, नागरिकांचा कार्यक्रमात सहभाग होता. आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक आरती संकेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योगपटू सत्यम व गायित्री यांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले.