सरकारी अधिकाऱ्यांना योग दिन बंधनकारक
सहभागी झाल्याचा पुरावा करावा लागणार सादर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली माहिती
पणजी : येत्या 21 जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनात सहभागी होण्याचे बंधन सरकारी कर्मचारी, अधिकारी यांना घालण्यात आले असून सहभागी झाल्याचा फोटो खाते प्रमुखांना सादर करणे देखील सक्तीचे केल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. योग दिन साजरा करण्यासाठी काल सोमवारी मंत्रालयात बैठक घेण्यात आली. त्यानंतर डॉ. सावंत पत्रकार परिषदेत बोलत होते. योग दिनाच्या आयोजनासाठी आयुष आणि क्रीडा ही दोन प्रमुख खाती असून पतंजली, रवीशंकर, ब्रह्मेशानंद स्वामी, ब्रह्मकुमारी इत्यादी संस्थांचे प्रतिनिधी बैठकीला हजर होते. त्या संयुक्त बैठकीतून गोव्याचा हा कार्यक्रम ठरवण्यात आल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली.
पहिल्या दिवसापासून शाळांत योग
येत्या 4 जूनपासून शाळा सुरु होणार असून पहिल्या दिवसापासूनच शाळेतून योगाचे धडे देण्यात यावेत. येत्या 21 जूनपूर्वी योगाचा सराव व्हावा म्हणून सर्व शैक्षणिक संस्था, सरकारी व खासगी शाळांतून योग शिकवण्यात यावा. त्यासाठी योग प्रशिक्षकाची गरज भासल्यास आयुष किंवा क्रीडा खात्यास कळवावे. ते पुरवले जातील. ज्यांना योग दिनासाठी प्रशिक्षक म्हणून काम करण्याची इच्छा आहे, त्यांनी वरील दोन्ही पैकी एका खात्याकडे नोंदणी करावी, असे डॉ. सावंत यांनी सूचित केले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून हा शनिवारी येत असून सरकारी कर्मचारी, अधिकारी यांनी आपापल्या गावातील पंचायतीत किंवा इतर कोणत्याही योग शिबिरात सहभागी व्हावे. सहभागी झाल्याचा पुरावा म्हणून फोटो काढून तो खाते प्रमुखांना देण्यात यावा, असे डॉ. सावंत यांनी बजावले आहे.
राज्यात 30 हजार ठिकाणी कार्यक्रम
सकाळी 7 ते 8 या एकाच वेळेत विविध ठिकाणी हा योग करण्यात येणार असून गोव्यात सर्व ठिकाणी मिळून 30 हजार योगचे कार्यक्रम होतील. खासगी कर्मचाऱ्यांनी देखील 21 जूनच्या योग दिनात सहभागी व्हावे.
योग अॅथलेटीक्स कन्याकुमारीला
योग अॅथलेटीक्समध्ये नाव कमावलेल्या गोवा राज्यातील 16 जणांना कन्याकुमारी येथे पाठवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कन्याकुमारी येथे योग शिबिरात सहभागी होणार आहे. दिल्लीत झालेल्या निती आयोग बैठक व मुख्यमंत्री परिषदेला डॉ. सावंत हे उपस्थित होते. तेथे झालेल्या चर्चेचा थोडक्यात सारांश त्यांनी सांगितला. विकसित राज्य, विकसित भारत 2047 आणि 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन हे दोन प्रमुख विषय चर्चेसाठी होते. त्या अनुषंगाने तेथे चर्चा झाली. जगभरातून सुमारे 180 देशात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होतो. योगाचे महत्त्व सर्वांना पटले आहे हेच त्यातून दिसून येते, असे डॉ. सावंत म्हणाले.
‘विकसित - गोवा’चे ध्येय गाठण्याचा संकल्प
विकसित भारत, विकसित गोवा - 2037 हे गोव्यासाठीचे ध्येय आखण्यात आले असून 2047 चे स्वप्न 10 वर्षे अगोदरच गाठण्याचा गोवा सरकारचा संकल्प असल्याचे डॉ. सावंत यांनी तेथे नमूद केल्याचे सांगितले. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर प्रत्येक गाव, जिल्हा आणि राज्यांचा विकास झाला पाहिजे हा मुलमंत्र मोदी यांनी दिल्याचे डॉ. सावंत यांनी नमूद केले. निती आयोगाकडे गोव्याचे अनेक प्रस्ताव सादर करण्यात आले असून त्यांना मान्यता मिळणार, अशी आशा त्यांनी वर्तवली.
मुख्यमंत्री परिषदेत विविध निर्णय
मुख्यमंत्री परिषदेत ऑपरेशन सिंदूर व जातीनिहाय जनगणना यासाठी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन करणारे ठराव संमत झाले. त्याशिवाय मोदी यांच्या कार्यकाळास 11 वर्षे पूर्ण झाली म्हणून विशेष कार्यक्रम आखण्याचे तसेच आणिबाणी लादल्यास 50 वर्षे पूर्ण झाली म्हणून तो काळा दिवस पाळण्याचे ठरवण्यात आल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.
खाजन शेतीच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव सादर
गोव्यातील दहा हजार चौ. मी. खाजन शेतजमिनीचे पुनर्वसन करावे, असा प्रस्ताव आपण नीती आयोगाला सादर केला आहे. त्या अनुषंगाने आयोगाचे पथक लवकरच गोव्यात येऊन प्रत्यक्ष पाहणी करुन तसेच अन्य तज्ञ लोकांकडून माहिती मिळवून त्याचा अभ्यास करुन सविस्तर अहवाल केंद्रीय कृषी मंत्रालयाला सादर करणार आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.