मनावर जय मिळाला की योग सुलभ होतो
अध्याय पाचवा
कुठलाही अभ्यास करायचा झाला की तो अगदी मन लावून करावा लागतो आणि हे असं करणं आवश्यक आहे हे जो मनाला समजाऊन सांगू शकतो तो मन लावून अभ्यास करण्यात यशस्वी होतो. आता असं करताना निग्रहाने मनाला इतर गोष्टी निक्षून सोडाव्या लागतात. त्या सोडताना मनाला वाईट वाटत असतं पण त्याचवेळेस त्याला हे समजून येतं की, आत्ता जरी मी त्याग केलेला असला तरी तो त्याग मला मोठ्या गोष्टी साध्य करून देणारा आहे. अशी ज्याला खात्री वाटत असते तो यशस्वी होतो. परीक्षेचा पेपर लिहिताना विद्यार्थी असाच विचार करत असतो. योगाभ्यासात मनोनिग्रहाची परीक्षा देताना कुणाकडून कसलीही अपेक्षा न केल्यास आपोआप आसक्ती दूर होते. आसक्तीमुळे हातून पापकर्मे घडतात तर असक्तीरहित झाल्यास सुखशांती मिळते. मनोनिग्रहासाठी अभ्यास आणि वैराग्य ही दोन साधने भगवद्गीता सांगते. त्याच्या जोडीला गणेशगीतेत बाप्पा अतिदु:ख सोसणे, गुरुकृपा आणि सत्संग ही तीन अधिक साधने सांगतात. वरील सर्व गोष्टींचा कसोशीने पाठपुरावा करून योग्याने स्वत:चं मन जिंकणं हे सगळ्यात महत्त्वाचे आहे असं बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.
अभ्यासाद्वा वशीकुर्यान्मनो योगस्य सिद्धये।
वरेण्य दुर्लभो योगो विनास्य मनसो जयात् ।। 23 ।।
अर्थ-अभ्यासाने योगाच्या सिद्धीकरिता मन जिंकावे. वरेण्या, या मनाच्या जयावाचून योग दुर्लभ आहे.
विवरण-माणसाचं मन निरनिराळ्या इच्छा करत असतं आणि त्या पूर्ण होण्यासाठी इंद्रियांच्या आवश्यक त्या हालचाली घडवून आणत असतं. मनाला होणाऱ्या इच्छा या बहुतेक स्वार्थ साधण्यासाठी असतात आणि त्या पूर्ण करण्याच्या प्रयत्नात त्याच्या हातून पाप घडतं. त्याचे भोग भोगण्यासाठी त्याचा पुनर्जन्म होतो. आता ही बाब सगळ्यांना माहीत आहे तरीसुद्धा मनुष्य इच्छा करत राहतो. हे टाळण्यासाठी मनुष्याने चित्तशुद्धीसाठी प्रयत्न करावा. ईश्वरावर, सद्गुरूंवर सर्व भार टाकून स्वस्थ रहावे म्हणजे निरिच्छता येईल. ही निरिच्छताच मनावर विजय मिळवून देते. काही इच्छा झाली तर ईश्वराला सांगावे त्याला योग्य वाटल्यास पूर्ण करेल जर पूर्ण झाली नाही तर ती गोष्ट आपल्यासाठी योग्य नव्हती असे समजावे. असे केल्यास मनाला होणाऱ्या इच्छेनुसार होणाऱ्या इंद्रियांच्या हालचाली आपोआप थांबतील आणि चित्तशुद्धी साधली जाईल. शम आणि दम हे गुण यासाठी फार उपयोगी आहेत. शम म्हणजे सहनशीलता आणि दम म्हणजे आहे त्यात समाधानी राहण्याची कला. शम आणि दम साध्य झाले की, माणसाचं मन एकाग्र होऊ लागेल कारण आता त्यात इतर विचारांना किंवा त्या विचारांना फुटणाऱ्या फाट्याना वाव नसेल.
बाप्पांनी मनोजय साध्य करण्यासाठी अभ्यास, वैराग्य व संतसंगती हे उपाय सांगितले. वरेण्याला मनातून हे सर्व पटलंय पण तरीसुद्धा मनोविजय मिळवून आवश्यक ती साधना करण्यासाठी दीर्घकाळ लागत असणार याचाही त्याला अंदाज आलाय आणि त्यामानाने आयुष्याचा कालावधी छोटा वाटल्याने तो बाप्पांना पुढील श्लोकात विचारतोय की, एका जन्मात योगाभ्यास पूर्ण झाला नाही तर त्या योग्याला कोणती गती मिळते?
योगभ्रष्टस्य को लोकऽ का गतिऽ किं फलं भवेत्।
विभो सर्वज्ञ मे छिन्धि संशयं बुद्धिचक्रभृत्
।। 24।। वरेण्य म्हणाला, हे सर्वज्ञा, सर्वव्यापका, ज्ञानचक्रधारका, योगभ्रष्ट मनुष्याला कोणता लोक मिळतो? कोणती गती मिळते? कोणते फल मिळते? ह्या माझ्या शंकांचे निरसन करा.
विवरण-राजाच्या लक्षात आलं की, मनोजय साधणं हे तसं कठीण काम आहे. बाह्य आकर्षणांचा मोह होऊन योगाभ्यासात खंड पडणं सहज शक्य आहे. अशा प्रकारे चिकाटी कमी पडल्याने ज्याचा योगाभ्यास अपूर्ण राहतो त्याला जीवनात काहीच साध्य झालं नाही असं वाटण्याची शक्यता आहे. म्हणून राजाने वरील शंका बाप्पांना विचारली.
क्रमश: