For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

हनी सिंगच्या पुतण्याचा भीषण अपघातात मृत्यू; मित्राचाही जीव गेला, रॅपरची भावूक पोस्ट

04:02 PM Nov 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
हनी सिंगच्या पुतण्याचा भीषण अपघातात मृत्यू  मित्राचाही जीव गेला  रॅपरची भावूक पोस्ट
Advertisement
जालंधर : प्रसिद्ध रॅपर आणि गायक यो यो हनी सिंग याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचा पुतण्या विदित ओलक याचा पंजाबमधील जालंधर येथे झालेल्या भीषण कार अपघातात मृत्यू झाला. या दुर्घटनेत विदितचा मित्र आरव तलवार याचाही जीव गेला. या घटनेनंतर हनी सिंगने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या दुःखाला वाट मोकळी करून दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विदित आणि आरव हे वाढदिवसाच्या पार्टीवरून कारने परतत असताना रविवारी पहाटे हा अपघात झाला. जालंधरमधील पोलीस लाइन्स परिसरातील उड्डाणपुलावर त्यांच्या कारची रस्त्यावर उभ्या असलेल्या महानगरपालिकेच्या ट्रॅक्टरला जोरदार धडक बसली. या कारमध्ये एकूण पाच जण प्रवास करत होते. त्यापैकी विदित आणि आरव यांचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे सुरक्षित असल्याचे वृत्त आहे.

Advertisement

पहाटे 3 वाजता पोलिसांना मिळाली माहिती

'इंडिया टुडे'च्या वृत्तानुसार, बरादरी पोलीस ठाण्याचे एसएचओ साहिल चौधरी यांनी सांगितले की, पोलिसांना पहाटे सुमारे 3 वाजता अपघाताची माहिती मिळाली. त्यावेळी महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी उड्डाणपुलावर साफसफाईचे काम करत होते. कचरा गोळा करण्यासाठी त्यांनी ट्रॅक्टर रस्त्यावर उभा केला होता. बीएमसी चौकाकडून बीएएसएफ चौकाच्या दिशेने जात असताना कार या ट्रॅक्टरला धडकली.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संबंधित कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. विदित आणि आरव यांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आल्याचे वृत्त आहे. कुटुंबीयांनी पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यास नकार दिल्याची माहितीही समोर आली आहे.

Advertisement

हनी सिंगची भावनिक पोस्ट

या घटनेनंतर हनी सिंगने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर केली. त्यात त्याने पुतण्याच्या निधनामुळे आपण पूर्णपणे खचल्याचे व्यक्त केले. 'हे माझ्यासाठी दुःखाने भरलेले दशक होते. मी माझ्या पुतण्याला गमावले. ही बातमी माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक आहे,' अशा आशयाची भावना त्याने व्यक्त केली. पोस्टच्या शेवटी त्याने 'भोलेनाथ, मेहेर मेहेर' असेही म्हटले.

विदित ओलक हा पंजाबी संगीत क्षेत्रातील 'स्पीड रेकॉर्ड्स'चे मालक दिनेश यांचा मुलगा होता, तर अपघातात मृत्यू झालेला आरव तलवार हा 'पॅपी स्वीट्स'च्या मालकाचा मुलगा असल्याची माहिती आहे. या दुर्घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.

Advertisement
Tags :

.