असेही एक ‘चॅलेंज’
माणूस हा छंदवेडा प्राणी आहे. त्याला वेगवेगळी ‘फॅडस्“ करणे आवडते. कित्येकदा तो अशा फॅडस्ची शिकारही बनतो. एकदा एक फॅडचा प्रारंभ एका व्यक्तीने केला, की अनेकांमध्ये त्याचा झपाट्याने प्रसार होतो आणि असंख्य लोक त्याच कृतीच्या मागे लागतात. सध्याच्या काळात मोबाईल गेन्सने असे वेड लोकांना लावल्याचे दिसून येते. अनेकांनी, विशेषत: लहान मुले आणि पौगंडावस्थेतील युवकांनी अशा गेम्सच्या आहारी जाऊन आपली अनेक प्रकारे हानी करुन घेतली आहे. तरीही हे वेड कमी होत नाही. सध्या चीनमध्ये अशाच प्रकारचा एक खेळ लोकप्रिय झालेला आहे. त्याचे नाव ‘लँप पोस्ट चॅलेंज“ असे ठेवण्यात आले आहे. हा संगणकीय किंवा मोबाईल खेळ नाही. तर खराखुरा करावा लागणारा खेळ आहे.
या खेळात दिव्याच्या खांबावर चढून दोन्ही पाय एकमेकांवर दुमडून आणि हातांची मिठी खांबला मारुन बसावे लागते. या खेळातील खरे आव्हान पुढे आहे. एकदा दोन्ही पाय एकमेकांमध्ये अडकवून खांबाला कवटाळून बसल्यानंतर कोणत्याही बाह्या साहाय्याशिवाय किंवा आधाराशिवाय स्वत:ची सुटका करुन घ्यावी लागते. हा ट्रेंड चीनच्या जियांगसू प्रांतात प्रथम लोकप्रिय झाला. काही वर्षांपूर्वी एका महिलेने हा प्रयोग करुन पाहिला. पण ती स्वत:ची सुटका करुन घेऊ शकली नाही. तिने बराच प्रयत्न केला पण तो वाया गेला. इतरांनीही तिला साहाय्य करण्याचा प्रयत्न केला पण काहीही उपाय चालला नाही. अखेर पोलिसांना बोलवावे लागले. यांनी येऊन तिची खांबावरुन सुटका केली. मात्र, तेव्हापासून अनेकांच्या मनात हा प्रकार करुन बघण्याची इच्छा निर्माण झाली. तेव्हापासून चीनच्या अनेक भागांमध्ये हा ट्रेंड पसरला आहे. काहीजण स्वत:ची, अन्य कोणत्याही साहाय्याशिवाय सुटकाही करुन घेऊ शकले आहेत, असे दिसून येते.