होय, तळहातावरची रेषा कोणीच बदलू शकत नाही
कोल्हापूर /सुधाकर काशीद :
‘कोणी कोणाच्या तळहातावरची रेषा कधीच बदलू शकत नाही’, असे कधी भावनात्मक अंगाने तर कधीच त्राग्याने म्हटले जाते. पण त्यात खरेच एक शास्त्राrय तथ्य असते आणि पोलीस तपासात गुन्हेगाराच्या हातावरील ही रेषा त्याला शिक्षेच्या कोठडीपर्यंत नक्कीच नेऊन पोहोचवत असते. आता गुह्याचा पोलीस तपास कितीही नव्या तंत्राने होत असला तरीही हाताच्या, बोटांच्या रेषांवरून गुन्हेगाराला गाठण्याचे जुने खणखणीत तंत्र आजही त्याच ताकतीने वापरले जात आहे. कोल्हापूर परिक्षेत्रातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम (सांगली) यांनी तर गुन्हेगाराच्या याच ठश्याच्या सूक्ष्म निरीक्षणातून एक वेगळे कौशल्य प्राप्त केले आहे आणि राज्य पोलीस कर्तव्य स्पर्धेत ते कांस्यपदकाचे मानकरी ठरले आहेत.
पोलीस खात्यात कदम यांचा अनुभव पंधरा वर्षाचा आहे. त्यांचा प्रत्येक दिवस काही ना काही नवे आव्हान घेऊन उजाडणारा आहे. घटना घडते. पोलीस पथक येते. कोणी पंचनामा करतो, कोणी जबाब घेतो, कोणी आरोपीच्या मागावर जातो. पण त्यातले काही पोलीस असे असतात, की ते गुह्याची जागा, तेथे पडलेला कागदाचा एखादा कपटा, दगड, माती, आसपास इतर अगदी काही बारीक-सारीक सूक्ष्म पुरावे ते शोधत असतात. डोळ्याला भिंग लावून बारकावे पाहत असतात. आणि त्यात ठसेतज्ञ महत्वाची भूमिका बजावतात. ते गुह्याच्या ठिकाणी जेथे जेथे गुन्हेगाराच्या हाताचा बोटाचा स्पर्श झाला असेल, त्या शक्यता तपासात असतात आणि सर्वच नाही, पण बऱ्याच गुह्यात संशयित गुन्हेगारांच्या बोटाचे ठसे हमखास सापडतात. आणि हा ठसा शोधण्यासाठी पोलिसांना पोलिसांच्या सूक्ष्म निरीक्षणाचा अक्षरश: कस लागत असतो. एखादा ठसा मिळाला तरी तो आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र सादर करताना खूप मोठा आणि शंभर टक्के विश्वसनीय असा पुरावा ठरतो.
सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम यांच्या अनुभवानुसार ‘प्रिन्सिपल ऑफ एक्सचेंज’ हा सिद्धांत पोलीस तपासात खूप महत्त्वाचा ठरतो. आपण ज्या ज्या ठिकाणाच्या संपर्कात येतो, तेथे कळत-नकळत आपला काहीतरी पुरावा सोडतच असतो. तो पुरावा हाताचा, बोटाचा, पावलाचा ठसा, एखादा केस, कागदाचा कपटा, हत्यार, रुमाल, कपड्याचा एखादा धागा आणि तुमचा अदृश्य वास तर तेथे हमखास असतोच. ज्या गुह्यात आरोपी पहिल्या फिर्यादीतच स्पष्ट झाला आहे, तेथे या सूक्ष्म निरीक्षणाची गरज नसते. पण गुन्हेगाराच्या हत्यारावरील बोटांचे ठसे पुरावा म्हणून खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. आणि पोलीस खात्यातील गुन्हे शोध पथक व ठसे तज्ञ केवळ हे सूक्ष्म निरीक्षण करत असतात. कारण आरोपी काही ना काही सूक्ष्म पुरावा नक्कीच आसपास सोडून गेलेले असतात आणि येथूनच या तपासाचे महत्त्व आणखी अधोरेखित होत जाते.
गुह्याच्या ठिकाणी मिळालेल्या हाताच्या बोटाच्या ठशांचे वर्गीकरण केले जाते. आणि सराईत गुन्हेगार असला तर हा ठसा कोणाचा, हे पहिल्या वर्गिकरणातच स्पष्ट होते. कारण जगातल्या कोणाही एका माणसाचा व दुसऱ्या माणसाच्या हाताचा बोटाचा ठसा कधीच एकसारखा नसतो. आणि ठसेतज्ञांच्या सूक्ष्म नजरेला प्रत्येक ठशातला फरक कळतो. पूर्वी काळाच्या पॅडवर बोट किंवा हात ठेवून गुन्हेगाराचे ठसे घेतले जायचे. आता ऑटोमेटेड मल्टीमॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम (अॅम्बीस) या अद्ययावत तंत्राने शाईच्या पॅडची गरज भासत नाही. आणि हा ठसा एकदा फीड केला व इतर गुह्याच्या तपासातील ठसा या तंत्राने मॅच केला की रेकॉर्डवरील नेमका आरोपी कळू शकतो. अर्थात आरोपी नवा असला तर त्याचा पूर्व इतिहास नसतो व त्याचा पूर्वीचा ठसा नसतो. पण तपासात तो निष्पन्न झाला तर त्याच्या ठशाचा पुरावा न्यायालयात महत्त्वाची भूमिका बजावतो आणि कोणी कोणाच्या तळ हातावरच्या रेषा कधी बदलू शकत नाही. या व्यवहारातील प्रचलित वाक्याची प्रचितीच हा ठसा देऊन जातो.

गुन्हेगारांनी सोडलेला दुवा शोधणे महत्वपूर्ण
गुह्यात आरोपी पकडणे हे साधे काम नसते. कारण गुन्हेगारही तपास यंत्रणाचा अभ्यास करून ‘शहाणे’ झालेले असतात. पण प्रिन्सिपल ऑफ एक्सचेंज या सिद्धांताने ते आपला काही ना काही पुरावा सोडतच असतात. आम्ही फक्त तोच दुवा शोधत असतो. सुतावरून स्वर्ग गाठणे, असाच हा काहीसा प्रकार असतो. पण आम्ही पोलीस खूप सूक्ष्मपणे हा तपास करत असतो. फक्त गोपनीयतेमुळे सगळे दुवे लगेच खुले न करण्याची दक्षता घेतो.
प्रफुल्ल कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक.
क्रिमिनल प्रोसिजर आयडेंटिफिकेशन अॅक्ट या नव्या कायद्यामुळे एक वर्षापेक्षा जास्त ज्या गुह्यात शिक्षा आहे, अशा सर्व आरोपींच्या हाताचे ठसे पोलीस आता घेऊ शकतात. हे ठसे तपासात खूप उपयोगाचे ठरतात.