येळ्ळूर ग्रामस्थांचा क्रीडांगणाला तीव्र विरोध
ग्रामसभेत ग्रामस्थांनी दिला आंदोलन करण्याचा इशारा : विविध समस्यांबाबत अधिकाऱ्यांना धरले धारेवर
येळ्ळूर : गायरान जमीन कमी असताना येळ्ळूरमध्ये क्रीडांगण उभे करण्यात येत आहे. त्यामुळे मोठी समस्या निर्माण होणार असून, कोणत्याही परिस्थितीत आम्ही क्रीडांगण करण्यास देणार नाही, असा इशारा ग्राम पंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी दिला आहे. सोमवारी येळ्ळूर येथील श्री चांगळेश्वरी मंदिरामध्ये ग्रामसभा घेण्यात आली. त्यावेळी हा विरोध केला आहे. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत अध्यक्षा लक्ष्मी मासेकर होत्या. गेल्या काही दिवसांपासून येळ्ळूर येथील गायरानमध्ये क्रीडांगण उभे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ग्रामस्थांचा विरोध असताना सरकारी पातळीवर दिशाभूल करून क्रीडांगण बनविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र त्याला आमचा तीव्र विरोध आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही क्रीडांगण होऊ देणार नाही, असे ग्रामसभेमध्ये ठराव करण्यात आला आहे.
जलजीवन मिशन योजना अजूनही अर्धवट
दरम्यान येळ्ळूर गावासाठी राबविण्यात आलेली जलजीवन मिशन योजना अजूनही अर्धवट आहे. तब्बल 8 कोटी 50 लाख रुपये या योजनेसाठी खर्च करण्यात येणार आहेत. 4 कोटी 99 लाख 50 हजार पाईप व इतर कामांसाठी खर्च केले आहेत. साडेतीन वर्षे झाली तरी ही योजना अर्धवट आहे. अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी येत असल्याने ही योजना कुचकामी ठरली आहे. यावेळी अधिकाऱ्यांना जाब विचारले असता ही योजना पूर्ण करू, असे आश्वासन दिले जात आहे. या योजनेतूनच सध्या असलेल्या जलकुंभांची दुरुस्ती करायची आहे. मात्र अजूनही त्याची दुरुस्ती केली नाही. योजना पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर 15 दिवसांची मुदत दिली आहे.
हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना धारेवर
जलजीवन मिशन योजना 15 दिवसांत पूर्ण झाली नाही तर संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. येळ्ळूर गावही बुडामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यालाही विरोध करण्यात आला असून तसा ठरावही मांडण्यात आला आहे. सध्या गावठान जागा कमी आहे. त्यामुळे गावठान वाढवून देण्याबाबत पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले. गावामध्ये अनेक ठिकाणी विद्युत खांब धोकादायक ठरले आहेत. ते कधी पडतील याची शाश्वती नाही. तेव्हा ते खांब तातडीने बदलावेत, अशी मागणी करून हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले.
मराठी मॉडेल हायस्कूलजवळून उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या गेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा धोका आहे. तेव्हा त्या वाहिन्या भूमिगत घालाव्यात, अशी मागणी करण्यात आली. एकूणच या बैठकीमध्ये विविध विषयांवर ठराव करण्यात आले. याचबरोबर अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले.
बैठकीला ग्राम पंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील, पीडीओ पुनम गाडगी, अधिकारी के. बी. देवाप्पगोळ, माजी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, ग्राम पंचायत सदस्य रमेश मेणसे, शिवाजी नांदुरकर, अरविंद पाटील, परशराम परीट, विलास घाडी, जोतिबा चौगुले, माजी ग्राम पंचायत सदस्य राजू पावले, राजू उघाडे, भरत मासेकर, ग्राम पंचायत सदस्या व सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.