For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

येळ्ळूर-सुळगा रस्ता बनला धोकादायक

10:29 AM Sep 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
येळ्ळूर सुळगा रस्ता बनला धोकादायक
Advertisement

खड्डे भरण्यासाठी ग्राम पंचायत सदस्यांनी घेतला पुढाकार : वाहनधारकांतून समाधान 

Advertisement

येळ्ळूर : नुकत्याच झालेल्या पावसाने येळ्ळूर सीमा ते सुळगा गावापर्यंतचा रस्ता उखडून जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. काही ठिकाणी तर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे समजणे कठीण झाले आहे. दुचाकी व चारचाकी चालकांना तारेवरची कसरत करतच ये-जा करावी लागत असून हे खड्डे म्हणजे अपघाताला निमंत्रणच आहे. येळ्ळूर सीमा ते पेट्रोलपंप दरम्यान तर रस्त्याच्या मधोमध खड्ड्यांची शृंखलाच पसरली असून वाहने पास करताना होणारी आदळआपट व तोल सावरताना वाहनधारकांच्या नाकीनऊ येत आहेत. तर गावातील मुख्य रस्त्यावर डांबर उखडून गेल्याने खडी आणि लहान मोठे खड्डेच आहेत.

खडीमुळे वाहन घसरुन पडण्याचे प्रकार रोजच घडताना दिसतात. सकाळ, संध्याकाळ होणारी वाहतुकीची कोंडी तर नित्याचीच झाली आहे. परमेश्वरनगर ते सुळगा रस्त्यावर वाहन पुढे कसे न्यावे हेच समजत नाही. पंक्चर व वाहन नादुरुस्ती यामुळे वाहनधारक वैतागले आहेत. याच रस्त्यावरुन अवचारहट्टी, यरमाळ, सुळगा, देसूर, राजहंसगड, नंदिहळ्ळीसह खानापूरपर्यंतच्या गावांना वाहतूक सुरू असून वाढती रहदारी लक्षात घेता रस्ता तत्काळ दुरुस्त करून धोकामुक्त करावा, अशी मागणी वाहनचालक व जनतेतून होत आहे.

Advertisement

अखेर कार्यकर्त्यांनी हाती घेतले खोरे, पाटी 

रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे वेळोवेळी निवेदन देवूनही झालेले दुर्लक्ष आणि आता पावसामुळे कामास होत असलेला विलंब बघून धोकादायक खड्डे बुजविण्यासाठी ग्राम पंचायत सदस्य व युवा कार्यकर्त्यांनी पुढाकार घेवून खोरे, पाटी हाती घेतले आहे. याबाबत ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष प्रमोद पाटील व माजी अध्यक्ष सतीश पाटील यांना विचारले असता धोकादायक खड्ड्यांमुळे ऐन सणामध्ये एखादी दुर्दैवी घटना घडू नये यासाठी व रिक्षा, चारचाकी, दुचाकी व अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांची होणारी दमछाक बघता रस्त्यातील खड्डे बुजविणे गरजेचे असल्याने पुढाकार घेवून खड्ड्यांमध्ये वाळू तसेच चिपिंग टाकून रस्ता वाहतुकीला सुरळीत केला.

मंडळाच्या गणेशमूर्तीचे आगमन होत असताना कोणतीच अडचण भासू नये व मूर्ती सुखरुप मंडपात विराजमान व्हाव्यात, गणेशोत्सवासाठी येणाऱ्या बाहेरील भाविकांची रस्त्यामुळे गैरसोय होवू नये म्हणून शासनाची वाट न बघता श्रमदानातून हे खड्डे भरुन जनतेला सुखकर प्रवासाची सोय केली असल्याचे सांगितले. यावेळी ग्रा.पं. सदस्य रमेश मेणसे, परशराम परिट, शिवाजी नांदुरकर यांच्यासह प्रसाद कानशिडे, एन. डी. पाटील, पृथ्वीराज पाटील, मधू नांदुरकर, अनिल सांबरेकर, मधू पाटील, शुभम पठाणे, आदित्य पाटील, अरुण मुरकुटे, आकाश मंगनाईक, सिद्धार्थ बागेवाडी, शुभम पाटील, सुधीर चौगुले, आकाश हलगेकर, अजय पाटील, संदीप पाटील, बजरंग घाडी यांनी दोन दिवस श्रमदानाने खड्डे भरण्याचे काम केले. त्यामुळे वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.