येळ्ळूर लक्ष्मी तलाव समस्यांच्या विळख्यात
तळीरामांचा बनलाय अड्डा :संबंधित विभागाचे स्वच्छता करण्याकडे दुर्लक्ष, उन्हाळ्यात पाण्याचा होतोय उपयोग
वार्ताहर/येळ्ळूर
एकेकाळी येळ्ळूर गावचा मानबिंदू असणारा लक्ष्मी तलाव आज समस्यांच्या गर्तेत सापडला असून तो तळीरामांचा अड्डा बनला आहे. तलावाच्या बांधावर जागोजागी दारूची रिकामी पाकिटे, बाटल्या, प्लास्टिक ग्लास, प्लास्टिक बाटल्या, सोबत गुटख्याची पाकिटे यांचे ढीग साचले आहेत. पेव्हर्स रस्त्याच्या दोन्ही बाजुला दारूच्या रिकाम्या पाकिटांशिवाय दुसरे कांहीच दिसत नाही. काही वर्षांपूर्वी स्वच्छ आणि संदर असणारा तलाव तळीरामांच्या अड्ड्याबरोबरच झुडुपे आणि रानगवताच्या विळख्यात हरवला आहे.
तलाव पीडब्ल्यूडीच्या अखत्यारित असून त्याकडे या विभागाचे दुर्लक्ष आहे. मध्यंतरी तलाव सुशोभीकरणासाठी तलावाभोवती पेव्हर्सचा रस्ता बनवला होता. लहान शोभिवंत झुडपे, फुलझाडी लागून विश्रांतीसाठी सिमेंटचे बाक होते. पेव्हर्सच्या बाजुला संरक्षणासाठी पाईप लावून पाण्याकडील बाजू बंदिस्त केली होती. लाखो रुपये खर्च करून लक्ष्मी तलाव पिकनिक पॉईंटबरोबर मॉर्निंग आणि इव्हनिंग वॉक पॉईंट बनविला होता. ऐतिहासिक राजहंसगडावर जाणाऱ्या हौशी पर्यटकांसाठी
विश्ा़dरांतीस्थान बनलेल्या लक्ष्मी तलावाचे नव्याचे नऊ दिवस सरले आणि त्यांच्या दुर्दशेला सुरुवात झाली. पेव्हर्स उखडले. त्यावर चोरट्यांनी डल्ला मारला. सभोवतालच्या रस्त्यावर अतिक्रमण होवून ठिकठिकाणी रस्ता बंद झाला. निगा न राखल्याने झाडे व वेळूंच्या बेटाची बेसुमार वाढ झाली आहे. पाण्याकडील बाजुला झुडपांनी आणि रानवेलींनी विळखा घातला. याच आडोशाचा फायदा घेत तळीरामांनी आपला अड्डा बनविला. स्वच्छ आणि सुंदर लक्ष्मी तलाव आज दुर्गंधीच्या विळख्यात सापडला असून कांही झुडपांमध्ये गांधील माशांनी आपले निवासस्थान बनविले आहे. हे चित्र बघता दुर्दैव तलावाचे की येळ्ळूरवासियांचे हा प्रश्न पडतो.
याच परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, ग्राम पंचायत कार्यालय, बसथांबा, प्राथमिक मराठी कन्नड शाळा, गणेश मंदिर तर आहेच. पण तळ्याच्या बांधावर आद्य पुरुषांचे मंदिर असून त्यांच्यासभोवती रिकामी दारूची पाकिटे आणि प्लास्टिक बाटल्यांचा ढीग पसरला आहे. सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत येथे तळीरामांची वर्दळ असते. यावर मात्र कोणाचाच दबाव नाही. ही एक शरमेची बाब म्हणावी लागेल.
याबाबत ग्राम पंचायतीला विचारले असता, आम्ही आमच्यापरीने प्रयत्न करून कांही वर्षांपूर्वी पोलिसांच्या मदतीने वचक बसविण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर म्हणावे तसे सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे येरे माझ्या मागल्या उक्तीप्रमाणे पुन्हा सुरू आहे. जरी या तलावावर ग्राम पंचायतीची मालकी नसली तरी स्वच्छता आणि तळीरामांच्या बाबतीत ठोस भूमिका घेणे हे त्यांचे कर्तव्य आहे. पण आजची लक्ष्मी तलावाची दयनीय स्थिती बघता याचे सोयरसुतक ग्राम पंचायत अध्यक्ष व त्यांच्या टिमला आणि अधिकारीवर्गाला नसावे, असे दिसते. कोणालाच या गुदमरणाऱ्या तलावाचे हुंकार ऐकू येत नाहीत. लक्ष्मी तलाव मात्र आपले पूर्वीचे सोनेरी दिवस आठवत समस्यांच्या विळख्यात कोणीतरी तारणहार येईल, या आशेवर डोळे लावून पहुडला आहे. त्याला ते गतवैभव मिळेल की नाही, हा प्रश्न मात्र एकंदरीत स्थिती बघता अनुत्तीर्ण आहे.
ते स्वप्न पूर्ण होईल का?
गावच्या मध्यभागी असणाऱ्या लक्ष्मी तलावासोभवती पेव्हर्सचा रस्ता बनवून तो मॉर्निंग व इव्हनिंग वॉक पॉईंट बनावावा. रात्रीच्या प्रकाशझोतात नाचणारी कारंजी आणि दिवसा तलावात नौकाविहार बनवून लक्ष्मी तलाव म्हणजे एक पिकनिक पॉईंट बनवावा, असे एक स्वप्न मध्यंतरी गावकऱ्यांनी पाहिले होते. ते पूर्ण होईल का?
ग्राम पंचायतीसह तरुण मंडळांनी पुढाकार घ्यावा
गावच्या मध्यभागी आणि गजबजलेल्या छ. शिवाजी रोडलगत दिवसाढवळ्या वावरणाऱ्या तळीरामांच्या बंदोबस्तासाठी आणि तलावाच्या स्वच्छतेसाठी ग्राम पंचायतीबराब्sार गावातील तरुण मंडळांनी पुढाकार घ्यावा आणि ही समस्या कायमची मिटविण्यासाठी ठोस तोडगा काढावा. येळ्ळूरसारख्या गावाला हे अशक्य नाही.
-ग्रामस्थ शिवाजी सायनेकर.