येळ्ळूर स्मशानभूमी वेली-झुडपांच्या विळख्यात : स्वच्छतेची नितांत गरज
ग्रामपंचायतीने गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी : प्लास्टिकच्या कचऱ्याचे ढीग : विषारी प्राण्यांचाही वावर
वार्ताहर /येळ्ळूर
येळ्ळूर स्मशानभूमीवर रानवेली आणि झुडपांचे आक्रमण झाले असून स्मशान शेड सोडल्यास सर्वत्र गवत, झुडुपे आणि वेलीनी विळखा घातल्याचे चित्र आहे. वेशीपासून स्मशानापर्यंत जाण्याचा रस्ताही रान उगवून भरलेला असून गटारीही बुजून गेल्या आहेत. गटारीत झुडुपे आणि गवताबरोबर प्लास्टिक बाटल्या, ग्लास यांचे ढीग साचल्याने होणारा पाण्याचा निचराही थांबला आहे. याच रस्त्यावर दहनादरम्यान काही विधी केले जातात. ते करण्यासाठीही जागा नसल्याने विधी दरम्यान अडचणी येत आहेत. रात्रीच्या वेळी एखादी घटना घडली तर वाळलेली झुडुपे आणि रानामुळे नागरिकांना सावधगीरीनेच पाऊल टाकावे लागत आहे. शिवाय अशा अडचणींच्या ठिकाणी विषारी प्राण्यांचा वावर असण्याची शक्यताही आहे. स्मशानामध्ये स्मशानशेड सोडल्यास झालेल्या पावसामुळे सर्वत्र रान आणि गवत उगवून दलदल झाली आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून क्षणभरही उभे राहू देत नाहीत. अशातच स्मशानाच्या जागेत ट्रॅक्टर ट्रॉली व अवजारे ठेवल्यानेही दुसरीच समस्या निर्माण झाली आहे. ग्राम पंचायतीने याकडे तात्काळ लक्ष घालून रस्त्यावरची वाढलेले गवत काढून व स्मशान स्वच्छता राबवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.