येडियुराप्पांचे राजकीय जीवन तरुणांसाठी आदर्श
त. भा. प्रतिनिधी
बेंगळूर :
माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचे पाच दशकांचे राजकीय जीवन आणि संघर्ष तरुणांसाठी एक आदर्श आहे. येडियुराप्पा यांच्यामुळे दक्षिण भारतात भाजपसाठी दरवाजे उघडले. दक्षिण भारतात सर्वप्रथम कर्नाटकात भाजपला सत्तेवर आणण्यात त्यांचे योगदान अमूल्य आहे, असे गुणगाण केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांनी केले.
माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय संसदीय मंडळाचे सदस्य बी. एस. येडियुराप्पा यांच्या राजकारणाला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त चित्रदुर्गमध्ये ‘अभिमानोत्सव’चे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी अमित शाह यांच्या हस्ते येडियुराप्पांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमप्रसंगी बोलताना अमित शाह म्हणाले, कर्नाटकातील विविध पंथाच्या मठाधीशांना एकत्रित आणण्यात येडियुराप्पांनी महत्त्वाची भूमिका बजावली, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केले.
येडियुराप्पा यांनी आपले संपूर्ण आयुष्य सामान्य लोकांसाठी समर्पित केले आहे. जेव्हा त्यांनी शिकारिपुरा येथील एक सामान्य तरुण म्हणून आपला प्रवास सुरू केला, तेव्हा त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. येडियुराप्पा यांची इच्छाशक्ती, रा. स्व. संघांची मूल्ये आणि ‘राष्ट्र प्रथम’ यावरील विश्वास ही त्यांच्या संपूर्ण आयुष्याची मार्गदर्शक तत्त्वे राहिली आहेत. जेव्हा भारताचा राजकीय इतिहास किंवा भाजपचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा दक्षिण भारतात भाजपला अढळ स्थान मिळवून देणाऱ्या नेत्यांमध्ये येडियुराप्पा यांचे नाव निश्चितपणे सुवर्ण अक्षरात लिहिले जाईल, असे शाह म्हणाले.
येडियुराप्पा यांनीच दक्षिण भारतात भाजपसाठी दरवाजे उघडले. बेंगळूरला जागतिक तंत्रज्ञान केंद्र म्हणून जगाच्या नकाशावर आणण्यास मदत केल्याबद्दल आणि लिंगायत, ओबीसी, दलित, गौडा व इतर समाजांमध्ये सलोखा वाढवण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांनी येडियुराप्पा यांची प्रशंसा केली.
येडियुराप्पा म्हणजे त्याग, परिश्रम अन् संघर्षाचे दुसरे नाव : विजयेंद्र
दूरदृष्टी आणि शेतकरी नेते असणाऱ्या येडियुराप्पांनी सत्तेसाठी नव्हे; तर शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा दिला. येडियुराप्पा म्हणजे त्याग, परिश्रम आणि संघर्षाचे दुसरे नाव आहे. माझ्यासारख्या अनेकांसाठी ते प्रेरणास्थान आहेत. कार्यक्रमाला उपस्थित असलेला जनसागर पाहिल्यानंतर येडियुराप्पांविषयी असलेल्या आदराची प्रचिती येते. हा एक ऐतिहासिक क्षण आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा यांनी केले.
अविरत संघर्षामुळे मला शक्ती मिळाली : येडियुराप्पा
मी पन्नास वर्षे राज्यातील जनतेच्या सेवेसाठी माझे जीवन समर्पित केले आहे. माझा जन्म श्रीमंत कुटुंबात झाला नव्हता. मी एक सामान्य व्यक्ती म्हणून वाढलो. अनेक चढ-उतारांमधून मला जावे लागले. पक्षसंघटना करण्यासाठी आणि राज्यातील लोकांच्या समस्या समजून घेण्यासाठी मी सतत राज्यभर प्रवास केला. अविरत संघर्षामुळे मला शक्ती मिळाली. माझा जन्म बुकनकेरे येथे झाला, पण मी शिकारीपुराला माझी कर्मभूमी बनवून शेतकरी, दलित आणि गरिबांच्या समस्या सोडवण्यासाठी काम केले, असे येडियुराप्पा यांनी सांगितले. शनिवारी चित्रदुर्गमध्ये आयोजित अभिमानोत्सव कार्यक्रमात सन्मान स्वीकारल्यानंतर बोलताना त्यांनी आपल्या राजकीय संघर्षाच्या जीवनाला उजाळा दिला.
कार्यक्रमाला राज्यातील अनेक मठांचे मठाधीश, भाजपचे सर्व प्रमुख नेते, खासदार, आमदार, पक्षाचे विविध स्तरावरील पदाधिकारी व लाखोंच्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते व येडियुराप्पांचे समर्थक उपस्थित होते.