यजिदी समुदायाने भारताकडे मागितली मदत
संयुक्त राष्ट्रसंघात समर्थनाची अपेक्षा
वृत्तसंस्था/ हैदराबाद
इस्लामिक स्टेटकडून अनन्वित छळ झालेल्या इराकमधील धार्मिक अल्पसंख्याक यजिदी समुदायाने भारताकडे मदत मागितली आहे. यजिदी समुदायाचे मुद्दे संयुक्त राष्ट्रसंघात उपस्थित करण्यास भारताने मदत करावी असे एका नेत्याने म्हटले आहे. इस्लामिक स्टेटने हजारो यजिदींची कत्तल केली होती. तर या समुदायाच्या महिला आणि मुलींचे लैंगिक शोषण केले होते.
2015मध्ये भारताकडून समर्थन मागणाऱ्या यजिदी प्रतिनिधिमंडळात सामील खद्र हजोयान हे आर्मेनियातील यजिदी राष्ट्रीय संघाचे अध्यक्ष आहेत. हैदराबाद येथे आयोजित ‘लोकमंथन-2024’मध्ये खद्र हजोयान यांनी भाग घेतला आहे. धार्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्यासमवेत अनेक संघटनांनी त्या काळात यजिदींना मदत पाठविली होती. आम्हा यजिदींकडे स्वत:चा कुठलाच देश नाही. भारत संयुक्त राष्ट्रसंघात एक प्रभावशाली देश आहे. भारत आमची वस्तुस्थिती जगासमोर मांडू शकतो आणि प्राचीन समुदायांपैकी एक असलेल्या यजिदींचे अस्तित्व समाप्त होण्यापासून वाचवू शकतो असे खद्र हजोयान यांनी म्हटले आहे.
जगभरात यजिदींची संगया सुमारे 20-30 लाख आहे. यजिदी सद्यकाळात जर्मनी, रशिया, आर्मेनिया, युक्रेन, जॉर्जिया, अमेरिका, कॅनडा, सीरिया आणि तुर्कियेसमवेत विविध देशांमध्ये राहत आहेत. यजिदी अद्याप देखील इराक, सीरिया आणि तुर्कियेमध्ये तात्पुरत्या छावण्यामंध्ये राहत आहेत. अनेक शरणार्थी आर्मेनियात पोहोचत असून तेथे त्यांना सुरक्षित वाटते. भारताकडून मदत मिळेल अशी आम्हाला आशा असल्याचे ते म्हणाले.