यतिंद्र यांच्या पुनरुच्चाराने राजकीय वातावरण तापले
हायकमांडच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता : शिवकुमार समर्थकांमध्ये संताप : 19 रोजी नवी दिल्लीत सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत बैठक होणार
बेळगाव : कर्नाटकात नेतृत्वबदलाविषयी कोणीही उघडपणे वक्तव्य करू नये, अशी ताकीद हायकमांडने केल्यानंतरही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे चिरंजीव यतिंद्र सिद्धरामय्या यांनी उघड वक्तव्यांचा सपाटा सुरूच ठेवला आहे. कर्नाटकात नेतृत्वबदल होणार नाही, सिद्धरामय्या हेच पुढील अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री असणार आहेत, असे सांगितले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे डी. के. शिवकुमार समर्थक संतप्त झाले आहेत.अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवार दि. 8 डिसेंबर रोजी डॉ. यतिंद्र सिद्धरामय्या यांनी राज्यात नेतृत्वबदलाची परिस्थिती नाही. हायकमांडही नेतृत्वबदल करायचा नाही, या निर्णयाप्रत पोहोचले आहे. त्यामुळे सिद्धरामय्या हेच पुढील काळासाठी मुख्यमंत्री असणार आहेत, असे सांगितले होते.
या वक्तव्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ माजली होती. आता अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी यतिंद्र यांनी याच वक्तव्याचा पुनरुच्चार केला आहे. काँग्रेसमधील काही आमदारांनी डॉ. यतिंद्र यांच्या वक्तव्याला विरोध केला आहे. त्यानंतर स्वत: सिद्धरामय्या यांनी डॉ. यतिंद्र यांना सर्किट हाऊसला बोलावून घेऊन नेतृत्वबदलाविषयी वक्तव्ये करू नयेत, अशी सूचना दिली होती. त्यानंतर मंगळवारी रात्री काकती येथील खासगी हॉटेलमध्ये झालेल्या काँग्रेस संसदीय पक्ष बैठकीतही नेतृत्वबदलाविषयी कोणीही वक्तव्य करू नये, हायकमांडचा निर्णयच अंतिम राहील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. या सर्व घडामोडींनंतरही गुरुवारी पत्रकारांशी बोलताना यतींद्र यांनी कर्नाटकात नेतृत्वबदलासाठी हायकमांडची मान्यता नाही, असे स्पष्ट केले आहे.
त्यांच्या या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार समर्थक आमदार संतप्त झाले असून त्यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या बाजूनेही उघड वक्तव्य सुरू करण्याचा हट्ट धरला आहे. मात्र, उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना संयमाचा सल्ला दिला आहे. डी. के. शिवकुमार समर्थक आमदार इक्बाल हुसेन यांनीही पत्रकारांशी बोलताना खदखद व्यक्त केली आहे. नेतृत्वबदलासंबंधी आपण वक्तव्य केले तर आपल्याला नोटीस दिली जाते. हायकमांड सशक्त आहे. ते योग्य निर्णय घेतील. यतिंद्र यांच्या वक्तव्यामागे कोण आहेत? याची माहिती नाही. वारंवार वक्तव्ये करणाऱ्यांनाच विचारा, असे सांगितले. बेंगळूरनंतर बेळगावातही सत्तासंघर्ष वाढल्याचे दिसून येत असून सध्याच्या माहितीनुसार अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी 19 रोजी नवी दिल्ली येथे सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.
यतिंद्र यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्रीच उत्तर देतील
डॉ. यतिंद्र सिद्धरामय्या यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सुवर्ण विधानसौधमध्ये पत्रकारांशी बोलताना यतिंद्र यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्रीच उत्तर देतील, असे सांगत आपल्या समर्थकांना त्यांनी संयमाचे धडे दिले आहेत.