यशवंतराव चव्हाणांची पणती 11 व्या वर्षी बनली लेखिका
सातारा :
महाराष्ट्राचे शिल्पकार आणि माजी मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांची पणती अमायरा चव्हाण वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी लेखिका म्हणून पदार्पण करत आहे. वाचनामुळे आपल्याला जगाचे भान मिळते, असे सांगणाऱ्या यशवंतराव चव्हाण घराण्याच्या परंपरेत वाढलेल्या अमायराने ‘द ट्रेल डायरीज’ ही साहसकथा लिहून बालसाहित्याच्या विश्वात दमदार पाऊल टाकले आहे
‘द ट्रेल डायरीज’ कादंबरी देशातील अग्रगण्य प्रकाशन संस्थांपैकी एक असलेल्या पेंग्विन रॅण्डम हाऊसच्या सहसंस्थेने पारट्रीचने प्रकाशित केली आहे. साहसी आणि कल्पनारम्य कथानक असलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन 5 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर सभागृहात होणार आहे.
या प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री अॅड. आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत. मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या संचालिका निधी चौधरी, प्रसिद्ध चरित्रलेखिका रीता राममूर्ती गुप्ता आणि बालसाहित्यिक राजीव तांबे यांचाही मान्यवर पाहुण्यांमध्ये समावेश आहे.
अमायरा चव्हाण हिच्या या कादंबरीतून एका नव्या पिढीच्या विचारांचे, स्वप्नांचे आणि कल्पनाशक्तीचे दर्शन घडणार आहे. वयाच्या अकराव्या वर्षीच लेखिका झालेल्या अमायराचे हे पुस्तक नव्या पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.
- यशवंतरावांनी लिहलेले ‘कृष्णाकाठ’ साहित्यसृष्टीचे वैभव
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी लिहलेले आत्मचरित्र ‘कृष्णाकाठ’ महाराष्ट्राच्या साहित्यसृष्टीतील वैभव समजले जाते. देवराष्ट्रे, कराडमधील बालपणापासून 1946 पर्यंतच्या आठवणी त्यांनी यात शब्दबद्ध केल्या आहेत. स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाचा, संघर्षाचा उल्लेखही आहे. कृष्णाकाठ हे पुस्तक बेस्ट सेलर ठरले. त्यानंतर मुंबईत मुख्यमंत्री म्हणून काम पाहताना सागरतीर व दिल्लीतील कारकिर्दीवर यमुनातीर हे दोन खंड लिहण्याचा त्यांचा मानस होता. मात्र ते अपुरे राहिले. याशिवाय भूमिका हे त्यांच्या विविध भाषणांचा समावेश असणारे पुस्तक, निवडक भाषणांचा संग्रह असणारे सह्याद्रिचे वारे, ललित लेखांचा संग्रह असणारे ऋणानुबंध तसेच स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या प्रश्नांवर चर्चा करणारे युगांतर ही पुस्तके त्यांनी लिहली. त्यांच्यावर मराठी साहित्यसृष्टीतील लेखकांनी विपुल प्रमाणात लेखन केले आहे.