तेंडोलीच्या यशवंत तेंडोलकर यांना 'राज्य सांस्कृतिक पुरस्कार' जाहीर
दशावतारातील भीष्माचार्य अशी ओळख ; आ. वैभव नाईकांनी निवासस्थानी जात केला सत्कार
वार्ताहर/ कुडाळ
राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणारा महाराष्ट्र शासनाचा 'राज्य सांस्कृतिक पुरस्कार' सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील तेंडोली- हुडकुंभावाडी येथील दशावतारातील भीष्माचार्य व ज्येष्ठ कलाकार यशवंत ( काका) रघुनाथ तेंडोलकर यांना जाहीर करण्यात आला. या अनुषंगाने आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी तेंडोली- हुडकुंभावाडी येथील त्यांच्या निवास्थानी भेट दिली. नाईक यांनी शाल-श्रीफळ पुष्पहार घालून त्यांचा सत्कार केला. त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे,उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी, कुडाळ शिवसेना नेते अतुल बंगे, सरपंच अनघा तेंडोलकर, उपसरपंच संदेश प्रभू, दीपक आंगणे,दशावतारी कलाकार दिनेश गोरे, कणकवली युवासेना उपतालुका प्रमुख सचिन आचरेकर, ग्रा. प. सदस्य बाळू पारकर,आकाश मुननकर,कौशल राऊळ, ग्रा. सदस्य मीनाक्षी वेंगुर्लेकर,रवींद्र खानोलकर,संतोष तेंडोलकर, प्रमोद खानोलकर, विशाखा चव्हाण, धाऊ खरात(मोरे), तेजस चव्हाण, अमित राणे आदी उपस्थित होते.
नाईक म्हणाले, यशवंत (काका) तेंडोलकर यांनी कोरोना कालावधीत कोरोनावर जिद्दीने मात केली. आज ते स्वतः दशावतार कंपनीत काम करीत नसले. तरी या वयातही ते जिल्ह्यातील अनेक कलाकारांना मार्गदर्शन करीत आहेत. त्यामुळेच त्यांना हा शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. असे सांगून त्यांना पुढील दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सत्काराबाबत तेंडोलकर बोलताना म्हणाले, आपल्या घरात पूर्वी कोणीही दशावतार कलाकार नसताना आपण वामनराव खानोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कला संपादन केली. अनेक विनोदी भूमिका आपण साकारल्या आहेत. दशावतार क्षेत्राच्या या कालावधीत आपण कै. सुधीर कलिंगण, विलास खानोलकर यांसारखे दिग्जय कलाकार तयार करण्याचे कार्य केले.दशावतारातील कलाकारांना मान सन्मान मिळावा यासाठी आपण राजकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून वेळोवेळी आवाज उठविण्याचे कार्य केले. त्याचाच मोबदला म्हणून शासनाने आपल्याला हा पुरस्कार दिला आहे. आपण या पुरस्काराने भावूक झालो आहे. असे त्यांनी सांगितले.