माजी पंचायत समिती सदस्य यशवंत भोजने यांचे निधन
कट्टा / वार्ताहर
मालवण तालुक्यातील कट्टा बाजारपेठ येथील रहिवासी आणि मालवण पंचायत समितीचे माजी सदस्य ,ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते यशवंत रामचंद्र भोजने (77 ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. श्री. भोजने हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ते म्हणून परिचित होते. मालवण पंचायत समिती सदस्य पदाची निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवून ती जिंकली होती. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. वरची गुरामवाडी ग्रामपंचायत मध्ये दोन वेळा त्यांनी सदस्य पद उपभोगले होते. तसेच मालवण तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष पद देखील त्यांनी समर्थपणे सांभाळले होते. त्यावेळी अनेक गोरगरीब लोकांना त्यांनी या योजनेचा लाभ करून दिला होता. तसेच ते कट्टा सोसायटी मध्ये सदस्य म्हणून कार्यरत होते. त्याच्या जाण्याने गावात एका निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते गेल्याची भावना व्यक्त होत होती. येथील स्थानिक स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.